पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बसची संख्या घटतेय | पुढारी

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बसची संख्या घटतेय

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवसांपासून वाल्हे (ता. पुरंदर) येथील स्थानकावर प्रवाशांना तासन् तास एसटी बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. सोमवारी (दि. 1) भरणी श्राद्ध कार्यक्रम असल्याने वाल्हे येथील स्थानकासमोर अनेक प्रवासी एसटी बसची वाट पाहत ताटकळत थांबल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक प्रवाशांना वेळेवर उचित ठिकाणी पोहचता आले नसल्याने त्यांची गैरसोय झाली. पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरून धावणार्‍या एसटी बसची संख्या दिवसेंदिवस कमी पडत आहे. त्यातच निरा बाजूकडून येणार्‍या सर्वच एसटी बस बहुतांश भरून येत असल्याने प्रवाशांना बसमध्ये उभे राहण्यासाठीही जागा मिळत नव्हती.

त्यामुळेच प्रवाशांना तीन ते चार तास ताटकळत थांबणे भाग पडले. तर, अनेकांनी मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत केले. काही बस वाल्हे स्थानकावर थांबतही नव्हत्या, तर काही बस स्थानकापासून दूरवर मागे किंवा पुढे थांबत होत्या. त्यामुळे बराच वेळ ताटकळत थांबलेल्या प्रवाशांची मोठी धावपळ होत होती. ऐन सणासुदीच्या सुरुवातीलाच एसटी बसच्या वाढत्या प्रवासीवर्गामुळे किंवा बससंख्येत घट केल्यामुळे धावपळ होत आहे. पुढे नवरात्र, दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणांच्या वेळी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर एसटी बससंख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

हेही वाचा :

Back to top button