

काही लोकांना अकारण कोणावरही संशय घेण्याची सवय असते. या सवयीमुळे एखाद्याचा दिवस खराब होत असेल तर ते एक 'पॅरानॉईड पर्सनालिटी डिसऑर्डर'चे संकेत असू शकतात. हा एक मानसिक आजार असून, तो काहीवेळा औषधोपचाराने आणि सकारात्मक विचाराने दूर करता येऊ शकतो. ( Paranoid personality disorder )
रुग्णाच्या मनातील संशयकल्लोळ दूर करताना नातेवाईकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. आपल्या मनाला एखादी लहान गोष्टसुद्धा लागत असेल,एखाद्यावर अविश्वास निर्माण होत असेल, अकारण संशय वाटत असेल आणि त्यामुळे असुरक्षिततेची भावना येत असेल तर कदाचित हा 'पॅरानॉईड पर्सनालिटी डिसऑडर'चा ( Paranoid personality disorder ) त्रास असू शकतो. हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. यामध्ये पीडित प्रत्यक्षात आणि काल्पनिक वस्तूतील फरक समजण्याचे विसरतो. लहानसहान गोष्टींवर संशय व्यक्त करण्याच्या सवयीमुळे दिवस खराब होतो. अशा प्रकारची स्थिती समजण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
प्रत्येक गोेष्टीवर संशय व्यक्त करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे मेंदूतील रचनेत बिघाड होणे किंवा एखाद्या अपघातामुळे मेंदूला आतून मार लागलेला असेल तर अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. काही बाबतीत असा त्रास होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे लहानपणी आलेला कटू अनुभव, कुटुंबातील तणावाचे वातावरण, करिअरमधील अपयश आदी कारणांमुळेदेखील काही जणांत हा मानसिक विकार होऊ शकतो. हा विकार आनुवांशिकदेखील असू शकतो.
एखादा व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर संशय व्यक्त करत असेल आणि त्याचा हा संशय बळावत असेल तर तो पॅरानॉईड डिसऑर्डर असू शकतो. स्थिती गंभीर झाल्यास मनातले विचार प्रत्यक्षात समोर घडत असल्याचा भास त्याला होऊ लागतो. अर्थात, हा त्याचा भ्रम असतो. त्याला तो सत्य म्हणून गृहीत धरू लागतो.
या मानसिक विकारावर उपचार करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेणे गरजेचे आहे. तसेच औषधेदेखील घ्यावी लागतात. संबंधिताचा विचार बदलण्याचा प्रयत्न करा. मनात नकारात्मक भावना येऊ देऊ नका. प्रेरणादायी पुस्तके वाचायला द्या आणि आनंदी ठेवा.
या स्थितीत पीडित व्यक्तीला एकटे सोडू नये. शरीराप्रमाणेच मन देखील आजारी पडू शकते, हे त्याला समजून सांगा. पीडित व्यक्तीने औषधे नियमित घ्यायला हवीत आणि यासाठी नातेवाईकांनी दक्ष राहावे. सकारात्मक गोष्टी सांगा आणि या आजारातून आपण लवकर बरे होऊ, असे रुग्णास पटवून सांगा. त्याच्या सवयीने आपल्याला त्रास होत असेल तरीही त्याबाबत बोलून दाखवू नका. त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करा. उपचारांदरम्यान संयम बाळगा. कारण, या आजारातून बरे होण्यासाठी रुग्णाला वेळ लागतो. डॉक्टरांच्या निर्देशांचे पालन करत उपचार सुरू करावेत.
हेही वाचा :