

पुढारी ऑनलाईन डेस्क : शापूरजी पालोनजी समुहाचे चेअरमन पालोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. पालोनजी यांनी झोपेत असतानाच अखेरचा श्वास घेतला. पालोनजी हे टाटा समुहातील (Tata Group) सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर होते. त्यांची टाटा समुहामध्ये १८.४ टक्के हिस्सेदारी होती. त्यांना समुहातील फॅन्टम ऑफ बॉम्बे हाऊस म्हणूनही ओळखले जाते.
शापूरजी पालोनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड आणि फोर्ब्स टेक्सटाइल्सचे ते मालक होते. ते असोसिएटेड सिमेंट कंपनी (Associated Cement Companies) आणि युरेका फोर्ब्सचे (Eureka Forbes) माजी अध्यक्ष होते. मिस्त्री यांचा जीवनप्रवास २००८ मध्ये मनोज नंबुरू यांनी लिहिलेल्या द मोगल्स ऑफ रिअल इस्टेट (The Moguls of Real Estate) या चरित्रातून उलगडला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना जानेवारी २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
एप्रिलच्या सुरुवातीला शापूरजी पालोनजी मिस्त्री आणि इतर सहा संचालकांनी युरेका फोर्ब्सच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. शापूरजी पालोनजी समुहाच्या विविध कंपन्यांमध्ये ५० हजार कर्मचारी काम करतात. या समुहाचा कारभार ५० देशांत आहे.
मिस्त्री यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा शापूर मिस्त्री यांच्याकडे शापूरजी पालोनजी समुहाची जबाबदारी आहे. त्यांचा लहान मुलगा सायरस मिस्त्री काही वर्षे टाटा ग्रुपचा अध्यक्ष होता. मिस्त्री यांची मोठ्या मुलीचे नाव लैला आहे. त्यांची धाकटी मुलगी आलू यांचे लग्न रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाले आहे.