अर्थभान : कॅशलेस मेडिक्लेमचे फायदे

Published on
Updated on

धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या महागाईच्या जगात आरोग्य उपचार ही बाब मोठी खर्चिक होऊन बसली आहे. अचानक उद्भवणारे आजार किंवा अपघात, दुर्घटना यामुळे कधी दवाखान्याचा दरवाजा ठोठावा लागेल, हे सांगता येत नाही. ठराविक वेतनातून दररोजचा खर्च भागविला जात असताना अचानक आलेल्या आजारपणाला कसे सामोरे जावू? या विचाराने काही जण चिंताग्रस्त होतात. कारण आजारपण काही सांगून येत नाही. प्रत्येकवेळी हाताशी पैसा असेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अनेकदा नातेवाईक, मित्र किंवा कंपनीला विनंती करून पैशाची जमवाजमव करून दवाखान्यातील खर्च भागवावा लागतो. परंतु कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी काढली तर या सर्व कटकटीतून मुक्‍तता होऊ शकते. वर्षभरासाठी ठराविक रक्‍कम विमा कंपन्यांकडे भरली की आजारपणाचा संपूर्ण खर्च विमा कंपनी उचलते. मात्र पॉलिसीचे हप्ते नियमित भरले तरच त्याचा फायदा पॉलिसीधारकांना होत असतो. 

आपल्याला किती लाखांचा मेडिक्लेम उतरावयाचा आहे, त्यावर विम्याची रक्‍कम ठरलेली असते. किमान एक लाखांपासून ते पंधरा लाखांपर्यत मेडिक्लेम उतरविला जातो. त्यात संपूर्ण कुटुंब कव्हर केले जाते. घरातील ज्येष्ठांची वयोमर्यादा साठपेक्षा अधिक असेल तर त्यास विम्याचा लाभ मिळत नाही. मात्र अगोदरपासूनच विमा हप्ता भरत असतील तर लाभ मिळू शकतो. कॅशलेस मेडिक्लेमसाठी विमा कंपन्यांनी मान्य केलेल्या रुग्णालयातच भरती होणे आवश्यक असते. त्याचबरोबर 24 तास हॉस्पिटलायझेशननंतर ही सेवा संबंधित रुग्णाला लागू पडते. पॉलिसीतील अटीप्रमाणे सर्व फायदे रुग्णास मिळतात. 

मेडिक्लेमचे कार्ड किंवा नंबर रुग्णालयास सादर केल्यास संपूर्ण खर्च विमा कंपनी उचलते. त्यासाठी अन्य खर्च करण्याची गरज भासत नाही. थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (टीपीए) च्या माध्यमातून पॉलिसीचा खर्च मंजूर केला जातो. सरकारी किंवा खासगी कंपनीत नोकरी करणार्‍या मंडळींना विमाकवच असतेच, त्याचबरोबर आपल्या कुटुंबीयांसाठी देखील वैयक्‍तिक पातळीवर मेडिक्लेम पॉलिसी काढू शकतो. या विम्यामुळे प्राप्तिकरात सवलतदेखील मिळते. 

कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसीत दोन प्रकारचे दावे असतात, ते आपण पाहू या.

नियोजनबद्ध दावा : कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसीधारकाने दोन ते तीन दिवस अगोदर रुग्णालयातील उपचाराची कंपनीला कल्पना देऊन त्याचा लाभ घेता येतो. त्यास नियोजनबद्ध दावा असे म्हणता येतील. बाळंतपण किंवा किडनी स्टोन ऑपरेशन, अ‍ॅपेडिंक्स आदींचा त्यात समावेश होतो. 

आपत्कालीन दावा : पॉलिसीधारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही सूचनांशिवाय तातडीने आजारपणामुळे दवाखान्यात दाखल व्हावे लागले तर विमा कंपनीकडे आपत्कालीन दावा करता येतो. अपघात, दुर्घटना किंवा अचानक आलेले आजारपणाच्या वेळी कॅशलेस मेडिक्लेमचा लाभ घेता येतो. 

कॅशलेसची सुविधा कशी घ्यावी?

कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा घेण्यासाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला किंवा टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देणे अनिवार्य ठरते. आजारपण किंवा आपत्कालीन स्थितीबाबत कंपनीला कळविल्यास कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यासांठी पॉलिसीधारकानेच फोन करावा असे बंधनकारक नाही. केवळ पॉलिसी क्रमांक सांगून रुग्णाची माहिती देणे, एवढीच विमा कंपनीची अपेक्षा असते. 

रुग्णालयात दाखल होताना विमा कंपनीने दिलेले मेडिक्लेम कार्ड जवळ बाळगणे गरजेचे आहे. त्यानुसार रुग्णालयात मेडिक्लेम विभागात ते कार्ड जमा करून तातडीने उपचाराला सुरुवात करता येऊ शकते.  वैद्यकीय तपासणी आणि चाचणीची गरज असेल तर तशी माहिती कंपनीला कळवावी लागते. मेडिक्लेम पॉलिसी घेताना कंपनीला आपल्या आणि कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्याची माहिती देणे गरजेचे आहे. विम्याची रक्‍कम जास्त असेल तर काही वेळा विमा कंपनी पॉलिसीधारकाचीं आरोग्य तपासणी करते. त्यानंतर मेडिक्लेम पॉलिसी बहाल करते.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news