

पुढारी ऑनलाईन : अनाथ शब्दाऐवजी स्वनाथ हा शब्द लावण्याची मागणी एका NGO ने केली होती. या शब्दाची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळून लावताना, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात अनाथ या शब्दाला कोणताही सामाजिक कलंक नाही, त्यामुळे तो बदलण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.
स्वनाथ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने 'अनाथ' शब्द बदलून 'स्वनाथ' करण्याची जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. स्वनाथ फाऊंडेशनने आपल्या याचिकेत दावा केला होता की, ज्या मुलांनी आधीच आपले पालक गमावले आहेत, त्यांना असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना 'अनाथ' म्हणणे हे एक गरजू, असहाय्य आणि वंचित बालक असे म्हटल्यासारखे होईल. 'स्वनाथ' या शब्दाचा अर्थ स्वयंपूर्ण आणि निश्चित असेल, असे याचिकेत म्हटले होते.
स्वनाथ फाऊंडेशनच्या याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने सांगितले की, हा मुद्दा अशा प्रकारचा नाही की ज्यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करावा. लक्ष्मणरेषा रेखाटून आपणही प्रत्येक प्रकरणात हस्तक्षेप करू नये. 'अनाथ' हा शब्द आजपासून नाही तर युगानुयुगे वापरला जात असल्याचे, याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे. यादरम्यान खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना विचारले की, 'अनाथ'मध्ये सामाजिक कलंक काय आहे? त्याचा इंग्रजी शब्द अनाथ आहे आणि हिंदी, मराठी आणि बंगाली भाषांमध्ये त्याचा समानार्थी शब्द 'अनाथ' आहे. हा शब्द बदलण्यास सांगणारा याचिकाकर्ता कोण आहे? त्याला भाषेबद्दल काय माहिती आहे?
या प्रश्नावर याचिकाकर्त्यातर्फे बाजू मांडणारे अधिवक्ता उदय वारुंजीकर म्हणाले की, ज्या मुलांच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे, अशा मुलांचा उल्लेख करताना चांगले शब्द वापरावेत. यावर खंडपीठाने 'अनाथ' हा शब्द बदलण्यास नकार देत या शब्दाला सामाजिक कलंक असल्याचे आम्हाला वाटत नाही, असा निकाल दिला आहे.