

गुहागर; पुढारी वृत्तसेवा : गुहागर तालुक्यातील तवसाळ येथील समुद्रकिनारी शुक्रवारी (दि. २४)रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास एक मृतदेह सापडला. सदर मृतदेह सुनिल गजानन सुर्वे (वय. ४३, रा. तवसाळ खुर्द भंडारवाडा) यांचा असल्याचे समोर आले. याआधी सुनिल सुर्वे गेल्या बुधवार (दि. २२) पासून बेपत्ता होते.
या घटनेबाबत पोलीस ठाणे गुहागर येथून मिळालेल्या माहिती अशी की, सुनिल सुर्वे दि. २२ सप्टेंबर रोजी बोटीतून जयगड खाडीत पडले होते. नातेवाईकांनी यासंबंधीची खबर २२ सप्टेंबरला रात्री ८.३० वाजता गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. गेले दोन दिवस तवसाळमधील ग्रामस्थ सुर्वे यांचा शोध घेत होते.
शुक्रवारी (दि. २४) रोजी दुपारी तवसाळ समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभुमीजवळ एका मनुष्याचा मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. म्हणून ग्रामस्थ घटनास्थळी गेले तेव्हा सदर मृतदेह सुनिल सुर्वे यांचाच असल्याची ओळख पटली.
तवसाळ खुर्द येथे रहाणारे संतोष भार्गव सुर्वे यांनी याबाबतची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली.
पंचनामा करुन पोलीसांनी सुनिल सुर्वे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कादवडकर करीत आहेत.
हेही वाचलंत का?