NZ vs AUS T20 : टीम डेव्हिडने किवींच्या जबड्यातून विजय हिसकावला, कांगारूंनी पहिली टी-20 जिंकली

NZ vs AUS T20 : टीम डेव्हिडने किवींच्या जबड्यातून विजय हिसकावला, कांगारूंनी पहिली टी-20 जिंकली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs AUS T20 : वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या रोमहर्षक टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या जबड्यातून विजय हिसकावून घेत 6 विकेट्स राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. या विजयासह कांगारूंनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने टी-20 मधील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग केला. यापूर्वी त्यांनी 2022 मध्ये मोहाली येथे भारताविरुद्ध 211 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले होते.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला सलामी जोडी फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात स्टार्कने 32 धावांवर ॲलनला वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्यानंतर रचिन रवींद्रने कॉनवेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. रचिनने 35 चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. तर कॉनवेने 46 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने नाबाद 19 तर आणि मार्क चॅपमनने नाबाद 18 धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 215 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (NZ vs AUS T20)

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचीही दमदार सुरुवात झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 15 चेंडूत 24 तर डेव्हिड वॉर्नरने 20 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 32 धावा फटकावल्या. कर्णधार मिचेल मार्शने 44 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची उपयुक्त खेळी खेळली. ग्लेन मॅक्सवेलने 11 चेंडूत 24 आणि जोश इंग्लिसने 20 धावा केल्या. शेवटी टीम डेव्हिडने 10 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या आणि आपल्या संघाला 6 गडी राखून सामना जिंकून दिला. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर 42 धावांत 2 बळी घेण्यात यशस्वी ठरला. लॉकी फर्ग्युसननेही 23 धावांत 1 बळी घेतला. टीम साऊदी आणि ॲडम मिल्ने यांनी 4-4 षटकात 50 पेक्षा जास्त धावा दिल्या. त्यांना विकेट मिळाली नाही. (NZ vs AUS T20)

अखेरच्या षटकात सामना पलटला

एकवेळ ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 9 चेंडूत 32 धावांची गरज होती. त्यावेळी टीम डेव्हिड 2 धावा तर मिचेल मार्श 72 धावांवर खेळत होते. 19व्या आणि 20व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर, टीम डेव्हिडने दाखवून दिले की तो सध्याच्या काळातील सर्वोत्तम फिनिशर का मानला जातो. त्याने 19 व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर एक चौकार आणि सलग दोन षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज टीम साऊदी 20 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने पहिल्या तीन चेंडूंवर केवळ चार धावा दिल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या तीन चेंडूत 12 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून डेव्हिडने साऊदीला दडपणाखाली आणले. यानंतर डेव्हिडने पुढच्या चेंडूवर दोन धावा मिळवल्या आणि त्यामुळे शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चार धावांची गरज होती. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर सुपर ओव्हरसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसत होते, पण टीम डेव्हिडने चौकार मारून ऑस्ट्रेलियाला शानदार विजय मिळवून दिला. मार्शला त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडमध्ये 3 वर्षातील पहिला टी-20 विजय (NZ vs AUS T20)

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडमध्ये गेल्या 3 वर्षातील पहिल्या टी-20 विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी मार्च 2021 मध्ये न्यूझीलंडमध्ये शेवटचा टी-20 सामना जिंकला होता. कांगारूंना गेल्या 15 वर्षांत किवींच्या देशात एकही टी-20 मालिका जिंकता आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news