ICC Test Ranikings : अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत भारतीयांचे वर्चस्व | पुढारी

ICC Test Ranikings : अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत भारतीयांचे वर्चस्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Ranikings : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेमुळे आयसीसी कसोटी क्रमवारीवर बराच परिणाम झाला आहे. या मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. जिथे टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाची नजर आता रांची कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्यावर असेल. दुसरीकडे, टीम इंडियाच्या खेळाडूंनी आयसीसी कसोटी क्रमवारीत धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना 434 धावांनी जिंकला. या विजयात भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजालाचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

टॉप 5 मध्ये तीन भारतीय खेळाडू (ICC Test Ranikings)

भारतीय संघाला कसोटी सामना जिंकून देणारा जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. या यादीतील पहिल्या पाचमध्ये एकूण तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. जडेजाव्यतिरिक्त आर अश्विन अश्विन 330 रेटिंगसह दुसऱ्या तर अक्षर पटेल 281 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.

याआधी अक्षर पाचव्या स्थानावर होता, पण बेन स्टोक्सच्या खराब कामगिरीचा त्याला फायदा झाला. अशा स्थितीत अष्टपैलू खेळाडूंच्या या विशेष यादीत भारताचे पूर्ण वर्चस्व दिसून येत आहे. यावरून हे स्पष्ट होते की टीम इंडियाच्या विजयात अष्टपैलू खेळाडूंचे योगदान अजूनही खूप मोठे आहे.

रवींद्र जडेजाची कमाल (ICC Test Ranikings)

जडेजाने राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात शतकी खेळी केली. तसेच कर्णधार रोहित शर्माच्या साथीने भारतीय डाव सावरला आणि भक्कम भागिदारी रचली. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या दुस-या डावात पाच विकेट घेऊन संघाच्या विजयावर मोहोर उमटवली.

Back to top button