Jaiswal ICC Test Rankings : यशस्वी जैस्वालचा धमाका! कसोटी क्रमवारीत मोठी झेप | पुढारी

Jaiswal ICC Test Rankings : यशस्वी जैस्वालचा धमाका! कसोटी क्रमवारीत मोठी झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jaiswal ICC Test Rankings : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीने खेळाडूंची कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (699 रेटींग) मोठी झेप घेतली असून तो 15 व्या क्रमांकावर पोहचला आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटनेला (719) त्याच्या वादळी शतकाचा फायदा झाला आहे. त्याने 13 वे स्थान गाठले आहे.

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत धमाका केला आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने 14 स्थानांची दमदार झेप घेतली असून तो आता 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके झळकावली. पहिला त्याने विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात 209 धावांची खेळी केली तर त्यानंतर राजकोट कसोटीच्या दुस-या डावात नाबाद 214 धावा फटकावल्या. या धमाकेदार खेळींचा त्याला कसोटी क्रमवारीसाठी जबरदस्त फायदा झाला आहे. मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने हा फॉर्म कायम ठेवला तर तो लवकरच टॉप 10 मध्येही पोहोचू शकतो. (Jaiswal ICC Test Rankings)

राजकोट कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो 13व्या क्रमांकावर होता, पण त्याने राजकोटमध्ये शतक झळकावले आणि तो 12व्या स्थानावर पोहोचला आहे. आता टॉप 15 मध्ये भारताचे चार फलंदाज आहेत. यात विराट कोहली (752) 7 व्या रोहित शर्मा (732) 12 व्या, ऋषभ पंत 14 व्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याच्या खात्यात 893 गुण आहेत, तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 818 गुण आहेत. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सतत खराब शॉट्स खेळून बाद होत असलेल्या जो रूटची दोन स्थानांची घसरण झाली आहे. आतापर्यंत तो तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता तो पाचव्या क्रमांकावर गेला आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल चौथ्या स्थानावरून तिसऱ्या तर पाकिस्तानचा बाबर आझम चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. उस्मान ख्वाजा अजूनही 765 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या दामुथ करुणारत्नेला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता 750 च्या रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. मार्नस लॅबुशेन अजूनही पहिल्या 10 मध्ये कायम आहे. तो 746 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे. (Jaiswal ICC Test Rankings)

Back to top button