

पुढारी ऑनालाईन डेस्क : मनी लाँड्रिंग आणि पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना आजही (दि.२) दिलासा मिळाला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई पीएमएलए कोर्टाने राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने राऊत यांना जून महिन्यात अटक केली होती. आता राऊत यांच्या जामीन याचिकेवर पीएमएलए न्यायालय ९ नोव्हेंबर रोजी निकाल देणार आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ED ने विरोध केला आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर EDने न्यायालयात याआधी प्रत्युत्तर दिले होते. "कारवाई टाकळण्यासाठी संजय राऊत या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून काम करत होते. संजय राऊत प्रभावी नेते आहेत, त्यांना जामीन मिळाला तर ते पुरावे नष्ट करतील," असे ED ने म्हटले आहे.
या प्रकरणात सरकारी मालमत्तेच्या मोबदल्यात संजय राऊत यांना वैयक्तिक लाभ झाला आहे. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो, त्यामुळे राऊत यांनी जो दिलासा मागितला आहे, तो अयोग्य आहे. या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून राऊत यांनी मोठी भूमिका बजावली आहे. पैशाचा माग राहू नये, यासाठी ते पडद्यामागून काम करत होते. त्यामुळे या प्रकरणात आपल्याला कोणताही लाभ झालेला नाही, हे त्यांचे म्हणणे ग्राह्य मानता येणार नाही, असे EDने म्हटले होते.
सध्या हा खटला महत्त्वाच्या पातळीवर आहे. दररोज नवे पुरावे समोर येत आहेत. या पुराव्यातून या प्रकरणात राऊत यांनी कशी भूमिका निभावली हे पुढे येत आहे. त्यामुळे या स्थितीत त्यांना जामीन देणे योग्य होणार नाही, असे मत EDने नोंदवले आहे. राऊत सध्या पत्राचाळ पुर्नविकास प्रकरणात अटकेत आहेत. ED ने ज्या एक कोटी साठ हजार रुपयांची विचारणा केली होती, त्याचा खुलास करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला होता.
हेही वाचलंत का ?