

भाग्यश्री प्रधान-आचार्य : डोंबिवली : ग्रामस्थांची सुख-दुःख पदरात घेऊन त्यांना लढण्याची ऊर्जा देण्यासाठी अनेक गावांत देवीने विविध रूपे घेतली आहेत. विविध रूपांनी वसलेल्या या देवीला ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. त्यापैकीच एक ग्रामदेवता म्हणजे डोंगराच्या कुशीत प्रकट झालेली मुंब्रा देवी.
समुद्र सपाटीपासून १५०० फुटांवर मंदिर असलेल्या मुंब्रा देवीचे दर्शन घेण्यासाठी ७५० पायऱ्या चढाव्या लागतात. देवीचे मंदिर मुंब्रा आणि दिवा या स्थानकाच्या दरम्यान रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना दिसते. मंदिराचा कळस दिसल्यानंतर अनेक भक्तांचे हात आपसूकच देवीला नमस्कार करण्यासाठी जोडले जातात. भक्तांच्या पाठीशी उभी राहणारी मुंब्रा देवी अनेकांच्या नवसाला देखील पावत असल्याचे सांगितले जाते.
मुंब्रा हे डोंगराच्या कुशीत वसलेले छोटसं गाव होत. गावात त्यावेळी आगरी लोकांची वस्ती अधिक होती. गावालगतच्या डोंगरावर दर पौर्णिमेला ज्योत पेटलेली गावकऱ्यांना दिसायची. हा भुताटकीचा प्रकार असल्याचे गावकऱ्यांना वाटत असे. त्यामुळे ग्रामस्थांची या डोंगरावर जाण्याची हिम्मतच होत नव्हती. गावातील नाना दादा भगत यांना स्वप्नात देवीने दृष्टांत दिला. या डोंगरावर माझे वास्तव्य असल्याचे सांगत दर्शनासाठी यावे असे सांगितले. नाना दादांनी सर्व गावाला स्वप्नातील हकीकत सांगितली. गावकऱ्यांनी मिळून एक दिवस ठरवला आणि डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. डोंगरावर गेल्यानंतर गावकऱ्यांना नवदेवी आणि एक मुख्य देवीचा स्वयंभू मुखवटा दिसला. देवीचा मुखवटा पाहिल्यानंतर ग्रामस्थांना आश्चर्य वाटले. तेव्हापासून ग्रामस्थांसह भगत कुटुंबीय देवीची भक्ती भावाने नित्य पूजाअर्चा करू लागले. आज भगत कुटुंबियांची तिसरी पिढी या देवीची पूजा करते.
नवरात्रीचे नऊ दिवस मंदिरात देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. नवमीच्या दिवशी भांडाऱ्याचे आयोजन केले जाते. देवीची पहाटे साडेपाच वाजता काकड आरती केली जाते. तर आठ वाजता आरती केली जाते.
या मंदिरात देवीचे नऊ मुखवटे पाहायला मिळतात. त्यामध्ये एक मुखवटा मुंब्रा देवीचाही आहे. महाराष्ट्रात देवीचे दहा मुखवटे एकत्र असणारे हे एकमेव मंदिर असावे, असे मोहन भगत यांनी सांगितले.
देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला उतरावे लागते. तेथून एका भुयारी मार्गातून पुढे गेल्यानंतर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत.
हेही वाचा :