Navratri 2022 : दुर्गेचे पहिले रूप : शैलपुत्री | पुढारी

Navratri 2022 : दुर्गेचे पहिले रूप : शैलपुत्री

वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम् ।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् ॥

दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ या नावाने ओळखले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे.

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिने दक्ष प्रजापती राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा दक्षाने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले की, प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले, तरीही तिचे समाधान झाले नाही.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे, याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला.

सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती ‘शैलपुत्री’ या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. ‘शैलपुत्री’ देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

Back to top button