

High Court
रायपूर: पत्नीने वारंवार जीवन संपवण्याच्या धमक्या देणे ही पतीसाठी मानसिक क्रूरता आहे, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे. स्वतःला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणे आणि पतीवर दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्यासाठी सतत दबाव आणणे ही देखील मानसिक क्रूरता असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
नेमकं प्रकरण काय?
न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती अमितेंद्र किशोर प्रसाद यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा निर्णय दिला. हे प्रकरण बालोद जिल्ह्यातील एका रहिवाशाने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेशी संबंधित आहे. जून २०२४ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता. पत्नीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. खंडपीठाने स्पष्ट केले की क्रूरता केवळ शारीरिक नसते; पतीमध्ये भीती निर्माण करणाऱ्या कृती देखील क्रूर मानल्या जातात. पतीने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी गुरु पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने म्हटले की त्याच्या पत्नीने वारंवार विष पिण्याची, जीवन संपवण्याची आणि रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली होती. न्यायालयाने म्हटले की, "पत्नीच्या वारंवार जीवन संपवण्याचा प्रयत्न आणि धमक्यांमुळे पतीला सतत मानसिक त्रास होत होता, पत्नीचे असे वर्तन क्रूरता आहे."
पतीवर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव
उच्च न्यायालयाने एका सामुदायिक प्रतिनिधीच्या साक्षीचाही उल्लेख केला. प्रतिनिधीने सांगितले की, पत्नी आणि तिच्या कुटुंबाने पतीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. पत्नीने मात्र हा आरोप फेटाळला. न्यायालयाला आढळून आले की, हे दोघे नोव्हेंबर २०१९ पासून वेगळे राहत आहेत. पती आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी अनेक प्रयत्न करूनही पत्नी परत येत नव्हती.
कोणत्याही कारणशिवाय पतीला सोडले
या जोडप्याचे लग्न मे २०१८ मध्ये झाले होते, परंतु नोव्हेंबर २०१९ पासून ते वेगळे राहत आहेत. पत्नीने केलेल्या घरगुती हिंसाचार आणि पोटगीच्या दाव्यानंतर पतीने घटस्फोटाची मागणी केल्याचे तिचे म्हणणे होते. मात्र, उपलब्ध पुराव्यांवरून पत्नीने कोणत्याही ठोस कारणाशिवाय पतीला सोडल्याचे न्यायालयाने मान्य केले.