

नागपूर : "धर्माचे पालन करण्यासाठी लाऊडस्पीकर वापरणे बंधनकारक नाही" अशी टीप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. गोंदियातील मशीद-ए-गौसिया येथे लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी मिळावी, यासाठी सचिव सय्यद इकबाल अली यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.
"दुसऱ्यांची शांतता भंग करून देवाची प्रार्थना करावी किंवा प्रार्थना करण्यासाठी ध्वनी प्रदूषण करणारी साधने वापराववीत, असा आदेश कोणताही धर्म देत नाही. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध, आजारी आणि मनोविकारग्रस्त व्यक्तींना शांततेची नितांत गरज असते," असे न्यायालयाने नमूद केले.
या संदर्भात कोणतीही कायदेशीर तरतूद याचिकाकर्त्याला दाखवता आली नसल्याने न्यायालयाने हा निर्णय देऊन याचिका फेटाळून लावली. तसेच राज्यघटनेतील कलम २१ मध्ये समाविष्ट असलेला जीवनाचा अधिकार हा केवळ जगण्याचा किंवा अस्तित्वाचा नाही तर सन्मानाने जगण्याचीही हमी देतो. त्यामुळे कोणालाही त्याच्या मर्जी विरोधात काहीही ऐकण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.