

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेरठ येथील सौरभ राजपूत हत्याकांडानंतर आता उत्तर प्रदेशातील बलिया येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे सहा तुकडे करून इतर ठिकाणी फेकले. याप्रकरणी मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पत्नी, प्रियकरासह चौघांना मंगळवारी (दि.१३) अटक केली.
देवेंद्र कुमार (वय ६२, रा. हरिपूर खरसरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी माया देवी (वय ४४), मिथिलेश पटेल (रा. बाळुपूर), अनिल कुमार यादव, (रा. खरीद), सतीश यादव (रा. चानू पाकड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक पिस्तूल, धारदार शस्त्रे आणि घटनेत वापरलेली बोलेरो जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र कुमार हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते निवृत्त झाल्यानंतर ते पत्नी मायावतीबरोबर बहादुरपूर परिसरात राहत होते. मायावतीने प्रियकर व त्याच्या साथीदारांसह बहादुरपूरमधील घरात देवेंद्र कुमार यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या शरीराचे सहा तुकडे करून ते इतर ठिकाणी फेकले होते. सिकंदरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरीद गावाजवळील एका शेतात हात-पाय व शीर नसलेल्या अवस्थेत प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनतर ही घटना उघडकीस आली.
देवेंद्र कुमार हे कोतवाली शहरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी मायावती हिने १० मे रोजी पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोलिस तपासादरम्यान देवेंद्र कुमार यांच्या फोनचे लोकेशन त्यांच्या घराजवळ दिसून आले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.त्यानंतर पोलिसांनी मायावती हिची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच मायावतीने आपणच अनैतिक संबधातून पतीचा काटा काढल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले.