

Virar Murder Case
होळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना विरार पूर्वेतील कणेर टोकरे पाडा परिसरात एका महिलेचे घडाशिवाय शिर सापडल्याने विरार परिसर हादरून गेला होता. हे शिर मांडवी पोलिस स्टेशनअंतर्गत कणेर पोलिस चौकी यांच्या हद्दीतील पिंरकुंडा येथील रोडवर रस्त्यापासून तीस फुटाच्या अंतरावर झुडपात दिसून आले होते. पोलिसांनी हे शिर ताब्यात घेऊन पंचनामा करून तपास सुरू केला होता. ही महिला ३० ते ३५ वयादरम्यानची असल्याचा अंदाज यावेळी बांधण्यात आला होता. या महिलेची हत्या करून हत्या करणाऱ्याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शिर व धड वेगळ्या ठिकाणी फेकले असावे असा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात येत होता.
हे शिर कोणाचे असावे, धड कुठे असेल, या महिलेचा मारेकरी कोण असेल, याची उकल करण्यासाठी मांडवी पोलिसांनी हा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे पोलिसांना घटनास्थळावर मिळालेल्या एका ज्वेलरी शॉपच्या पाकिटाशिवाय दुसरे काही न मिळाल्याने त्यांनी खूप बारकाईने पुन्हा पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली होती. यातील ज्वेलरीच्या मालकाशी जेव्हा संपर्क करण्यात आला तेव्हा मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी मुंबई गाठली. तिच्या पश्चिम बंगालमधील घरचा संपर्क साधण्यात पोलिसांना यश मिळाले होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांची आणि त्या महिलेशी व तिच्या पतीशी मागील दोन महिन्यांपासून कोणताही संपर्क होत नसल्याची बाब पुढे आली होती. पोलिसांना गुप्त सूत्रांकडून जी माहिती मिळाली होती, त्यात एक इमिटेशन ज्वेलरीचे काम करणाऱ्याचा ठावठिकाणा समजला. हा वसईतील नालासोपारा विभागात असल्याचे समजल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत भयंकर बाब उघड झाली.
मृत महिला ही तिच्या परिवारासह मुंबई परिसरात राहात असल्याचे समजले. त्या महिलेचे नाव उत्पला हरिश हिप्परगी व पती हरिश बरवराज हिप्परगी असे असून त्यांच्याशी कुटुंबाचा दोन महिन्यापासून संपर्क होत नसल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले होते. तपासात नालासोपारा येथून ताब्यात घेतलेला हरिश बरवराज हिप्परगी यानेच तिचा घात केल्याची बाब उघड झाली. मृत पत्नी उत्पला हिच्या बरोबर त्याचा गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे नेहमीच्या भांडणाला कंटाळून बरवराज याने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारले. त्यानंतर अत्यंत थंड डोक्याने त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम केले. यात तिचे मुंडके शरीरापासून वेगळे करून ते एका ट्रॅव्हल बॅगमध्ये टाकून पिरकुंडा येथील झाडाझुडपात फेकून दिले. तिचे बाकी शरीर हे देखील एका गोणीत भरून दुसरीकडे फेकले. सध्या गुन्हे पोलिसांनी बरवराज याला आता पुढील कारवाईकरिता मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.