

डोंबिवली : केळीच्या पानांच्या गठ्ठ्यांच्या विक्रीवरून दोघा फूल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये रविवारी भर दिवसा सकाळच्या सुमारास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वाद झाला. या वादातून एका विक्रेत्याने दुसऱ्या विक्रेत्यावर धारदार कैचीने हल्ला चढवून त्याचा जागीच मुडदा पाडला. यावेळी मृताची पत्नी आणि मुलगा वाचविण्यासाठी पुढे आले असता खून्याने मुलावर देखिल वार करून त्याला गंभीर जखमी केले. तर मृताच्या पत्नीलाही शिवीगाळ करत तिलाही मारहाण केली. रक्तरंजित राड्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या खुन्याला बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच वेड्या ठोकून गजाआड केले.
बाजारपेठ पोलिस ठाण्यात या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. चमनलाल नंदलाल कारला (५५) असे खून झालेल्या फूल विक्रेत्याचे नाव आहे. तर चिराग राजकुमार सोनी (२१) या खून्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. भर दिवसा सकाळच्या सुमारास घडलेल्या रक्तरंजित घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिराग सोनी (२१) आणि चमनलाल कारला (५५) हे दोघेही कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फूल बाजारात केळीच्या पानांची विक्री करतात. दोघेही समव्यवसायिक आहेत. चिराग आणि चमनलाल यांनी एकत्रितपणे जळगाव येथून केळीच्या पानांचे गठ्ठे मागविले होते. या गठ्ठ्यांमध्ये चार पानांचे गठ्ठे हे चमनलाल कारला याने मागविले होते. तर एक केळीच्या पानांचा गठ्ठा हा चिराग सोनी याने मागविला होता. जळगाव येथून केळीच्या पानांचे गठ्ठे आल्यानंतर ठरल्याप्रमाणे एक आणि चार गठ्ठे अशी विभागणी करून दोन्ही विक्रेते या पानांची विक्री करणार होते.
परंतु चमनलाल कारला याने चिराग सोनी याला त्याच्या केळीच्या पानांचा एक गठ्ठा न देता पाचही गठ्ठे स्वत:नेच बाजार समितीत विक्रीसाठी आणले. हे कळताच चिराग सोनी याने चमनलालकडे आपला एक केळीचा गठ्ठा देण्याची मागणी केली. यावरून चमनलाल आणि चिराग यांच्यात बाजार समितीच्या आवारात रविवारी सकाळी जोरादार वादावादी झाली. या वादातून संतप्त झालेल्या चिराग याने त्याच्या जवळील धारदार कैचीने चमनलाल याच्या पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात चमनलाल जागीच ठार झाला.
यावेळी चमनलाल याच्या बचावासाठी त्यांची पत्नी नितू कारला आणि मुलगा कार्तिक (२२) पुढे आले असता चिराग सोनीने कैचीने हल्ला करून कार्तिकलाही जखमी केले. शिवाय पतीला वाचविण्यासाठी गेलेल्या नितूला देखिल चिरागने शिवीगाळ करत मारहाण केली. चमनलाल कारला रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ठार झाल्याचे पाहून हल्लेखोर चिराग सोनी याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कार्तिक आणि त्याची आई नितू या माय-लेकाला रूग्णालयात हलविले. तर घटनास्थळाचा पंचनामा करून चमनलालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाकडे पाठवून दिला.
एकीकडे जखमी कार्तिक आणि त्याची आई नितू यांनी दिलेल्या जबानीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन पसार झालेल्या चिराग सोनी याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रक्ताळलेली कैची हस्तगत करण्यात आली असून पोलिस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.