

Jagdeep Dhankhar resigns
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला. त्यांनी आरोग्याचे कारण देत ते या पदावरुन पायउतार झाले आहेत. आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, संविधानाच्या कलम ६७ (अ) नुसार तात्काळ प्रभावीपणे भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्या दिवशी त्यांनी राज्यसभेच्या सभापतीपदी कामकाजदेखील सांभाळले आणि त्यानंतर त्यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयानंतर आता नवीन उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरु होईल.
७४ वर्षीय धनखड यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदी पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. पण त्यापूर्वीच ते या पदावरून पायउतार झाले. उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी राज्यसभेचे सभापतीपदही भूषवले. आता या पदासाठी भाजप विद्यमान राज्यपाल, पक्ष संघटनेतील वरिष्ठ नेते अथवा विद्यमान केंद्रीय मंत्री उमेदवार म्हणून निवडण्याची शक्यता आहे.
"आम्ही अजूनही त्यावर विचार करत आहोत. पण मला विश्वास आहे की या उच्चपदावर पक्षाकडून अशा व्यक्तीची निवड केली जाईल जो एक योग्य पर्याय असेल आणि त्यांची कारकीर्द वादग्रस्त नसेल," असे एका भाजप नेत्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
या पदासाठी संभाव्य पर्याय म्हणून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांची नावाची चर्चा सुरु आहे. ते जनता दल (युनायटेड) चे खासदार आहेत. ते २०२० पासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सरकारच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून पाहिले जाते.
नियमांनुसार, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पुढील सहा महिन्यांच्या आत होणे आवश्यक आहे. नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईपर्यंत, राज्यसभेचे उपसभापती सभागृहाचे कामकाज पाहू शकतात.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालवले. त्यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगासाठी आणलेले निवेदनही स्वीकारले. त्यानंतर अचानक रात्री ८.४० वाजता त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत राजीनामा सादर केला. नंतर रात्री ९.२५ वाजता त्यांनी सोशल मीडियाद्वारे याबद्दलची माहिती दिली. यामध्ये त्यांनी पद सोडण्याचे आरोग्य हेच कारण सांगितले. अचानक झालेल्या या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.