

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला असून, आरोग्यविषयक कारणास्तव आपण पदत्याग करत असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ‘आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी भारतीय संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार, तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.’
धनखड यांनी पत्रात पुढे असेही नमूद केले की, ‘उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व विकास पाहणे आणि त्यात सहभागी होणे, हे माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची बाब आहे. आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील या परिवर्तनकारी युगात सेवा करणे हा एक मोठा सन्मान होता.’
जगदीप धनखड यांनी तीन वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. याशिवाय, ते 1989 ते 1991 या काळात झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवले होते.
धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी चित्तोडगड येथील सैनिक शाळेत गेले. लष्करी अधिकारी होण्यासाठी त्यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी (NDA) निवड झाली होती, मात्र त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा मार्ग निवडला. राजस्थान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि जयपूरमध्ये त्यांनी दीर्घकाळ वकिली केली.