

Jharkhand Student Protest Devendra Nath Mahto Hunger Strike
नवी दिल्ली : झारखंडमधील सरकारी नोकरभरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. निदर्शने, धरणे आंदोलन आणि उपोषणांच्या या मालिकेमध्ये विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आले आहे. आमरण उपोषणाला बसलेल्या देवेंद्रनाथ यांनी नुकतीच प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, देवेंद्रनाथ महतो नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय आणि आंदोलनात्मक पार्श्वभूमी काय आहे, तसेच हे नवे प्रकरण नेमके कसे पेटले, याविषयीचा हा विशेष आढावा.
देवेंद्रनाथ महतो हे सध्या १४ व्या 'जेपीएससी' (झारखंड लोकसेवा आयोग) नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि इतर नोकरभरती परीक्षांमधील अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी २५ जुलैपासून रांची येथील जयपाल सिंह मुंडा क्रीडांगणावर धरणे आंदोलन सुरू केले असून, २ ऑगस्टपासून ते अनिश्चित काळासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत अन्नत्याग कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्रनाथ महतो हे झारखंडमधील रांची जिल्ह्यातील राहे तालुक्यातील कापिडीह गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील बिशंभर महतो हे सेवानिवृत्त सरकारी शिक्षक आहेत. देवेंद्रनाथ यांनी रांची येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कुर्माली भाषेत पदव्युत्तर पदवी (एम.ए.) आणि 'बी.एड.'चे शिक्षण घेतले. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, शेती आणि विद्यार्थी अशी त्यांची ओळख असून ते सिली विधानसभा मतदारसंघातील मतदार आहेत.
महाविद्यालयीन जीवनापासूनच देवेंद्रनाथ हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवत आले आहेत. २०१५ मध्ये तत्कालीन रघुवर दास सरकारच्या नियोजन धोरणाविरोधात त्यांनी पहिले मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर २०१६ मध्ये शिष्यवृत्तीत झालेल्या कपातीविरोधात त्यांनी तीव्र निदर्शने केली. २०१९ मधील जेपीएससी भरतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात त्यांनी पुकारलेल्या मोठ्या आंदोलनामुळे त्यांना राज्यभरात विद्यार्थी नेते म्हणून खरी ओळख मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमुळेच 'जेएसएससी-सीजीएल' आणि जॅकची (JAC) १० वीची परीक्षा रद्द करावी लागली होती, असा दावा त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जातो.
विद्यार्थी आंदोलनांच्या माध्यमातून जनमानसात स्थान निर्माण केल्यानंतर देवेंद्रनाथ यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला.
त्यांनी सिली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावले. त्या वेळी त्यांच्यावर एकही गुन्हेगारी नोंद नव्हती आणि त्यांनी आपली एकूण मालमत्ता सात हजार रुपये घोषित केली होती.
त्यांनी रांची लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता १.६६ लाख रुपये होती, तर ११ गुन्हेगारी प्रकरणांची नोंद होती. तुरुंगात असतानाही त्यांनी निवडणूक लढवून तब्बल १.४८ लाख मते मिळवली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
त्यांनी 'झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा'च्या (JLKM) तिकिटावर पुन्हा सिली मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना सुमारे ४४ हजार मते मिळाली आणि ते पुन्हा तिसऱ्या स्थानावर राहिले. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर १२ प्रकरणांची नोंद असून २.९० लाख रुपयांची मालमत्ता घोषित करण्यात आली आहे.
झारखंड लोकसेवा आयोगाने (JPSC) १४ व्या संयुक्त नागरी सेवा स्पर्धा परीक्षा-२०२५ च्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि या वादाची ठिणगी पडली. आयोगाने १०३ रिक्त पदांसाठी २,२०४ उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र घोषित केले.
निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम परीक्षार्थींनी प्रवर्गनिहाय गुणमर्यादा (कट-ऑफ) जाहीर करण्याची मागणी लावून धरली. निकाल प्रसिद्ध झाला तरी गुणमर्यादा सार्वजनिक न केल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर गुणवत्ता यादीवरही प्रश्न उपस्थित झाले. प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीवर आयोगाच्या घटनात्मक सदस्यांच्या स्वाक्षऱ्याच नव्हत्या, असा दावा अनेक उमेदवारांनी केला; ज्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
दरम्यान, सामाजिक मध्यमांवर (सोशल मीडिया) काही कथित उत्तरपत्रिका (OMR Sheets) तुफान प्रसिद्ध झाल्या. यामध्ये एका उमेदवाराने पहिल्या उत्तरपत्रिकेत केवळ ४८ प्रश्न सोडवले असतानाही त्याला मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. अनुशेष भरती परीक्षेतही असाच प्रकार घडल्याचे आरोप झाले. या प्रसिद्ध झालेल्या उत्तरपत्रिकांच्या सत्यतेची स्वतंत्र पुष्टी झालेली नसली तरी, यामुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष शिगेला पोहोचला.
उत्तरपत्रिकांशी संबंधित दावे समोर आल्यानंतर संतप्त विद्यार्थी जेपीएससी कार्यालयाबाहेर जमा होऊ लागले. पाहता पाहता या आंदोलनाने रौद्ररूप धारण केले. रांची येथील मोराबादी स्थित बापू वाटिका आणि अल्बर्ट एक्का चौकापासून सुरू झालेले हे आंदोलन जयपाल सिंह मुंडा क्रीडांगणापर्यंत पोहोचले आणि त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले.
हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून नोकरभरती परीक्षांमध्ये होणाऱ्या कथित गोंधळाविरोधातील आक्रोश असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनादरम्यान देवेंद्रनाथ महतो यांनी आमरण उपोषण सुरू करत, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी १४ वी जेपीएससी पूर्व परीक्षा रद्द करण्याची, टीडीपीएल या संस्थेच्या माध्यमातून झालेल्या परीक्षांची फेरतपासणी करण्याची आणि जेपीएससी व जेएसएससीच्या नोकरभरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
१४ वी जेपीएससी पूर्व परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी.
अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पुन्हा परीक्षेचे आयोजन व्हावे.
जेपीएससी आणि जेएसएससीच्या संपूर्ण भरती प्रक्रियेत व्यापक आणि ठोस सुधारणा करण्यात याव्यात.
'टीडीपीएल' (TDPL) या संस्थेच्या माध्यमातून पार पडलेल्या सर्व परीक्षांची फेरतपासणी व पुनर्रचना व्हावी.
या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) सखोल चौकशी व्हावी.
दोषींवर कठोर कारवाई करत शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित केली जावी.