

Live Weapons Lab Pakistan Lt Gen Rahul Singh Statement China Pakistan Nexus
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तान भारताविरुद्ध लढत होता, पण चीन आणि तुर्कस्तान त्याला पूर्ण साथ देत होते, असा खळबळजनक खुलासा भारतीय लष्कराचे डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट आणि सस्टेनेन्स) लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंग यांनी आज शुक्रवारी केला. नवी दिल्लीतील ‘न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज’ या FICCI च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पाकिस्तान समोर होता, पण त्यामागे चीनचा ‘लाईव्ह अपडेट’ सपोर्ट होता. चीन भारतातील महत्त्वाच्या लष्करी हालचालींची माहिती पाकिस्तानला रिअल टाईममध्ये देत होता, असेही ले. ज. राहुल सिंग म्हणाले.
लेफ्टनंट जनरल सिंग यांच्या म्हणण्यानुसार, "या चार दिवसांच्या संघर्षात (7 ते 10 मे) भारत एका सीमारेषेवर लढत होता, पण प्रत्यक्षात तीन शत्रूंशी झुंज चालू होती. पाकिस्तान, चीन आणि तुर्कस्तान. पाकिस्तानच्या 81 टक्के लष्करी साठ्यांत चीनकडून मिळालेली उपकरणे होती.
याशिवाय, तुर्कस्तानकडून ड्रोनसुद्धा पाकिस्तानला पुरवण्यात आले होते, जे भारतीय शहरांवर आणि सैनिकी ठिकाणांवर हल्ल्यासाठी वापरण्यात आले."
"चीन त्यांच्या शस्त्रांची इतर शस्त्रांवर चाचणी करते आणि त्यासाठी पाकिस्तान एकप्रकारे ‘लाइव्ह लॅब’ म्हणून वापरला जातो. त्यामुळे भारतासाठी हे गंभीर आव्हान आहे," असेही त्यांनी नमूद केले.
"DGMO स्तरावरील चर्चा सुरु असतानाही पाकिस्तानकडे भारतातील लष्करी हालचालींचे लाईव्ह अपडेट्स चीनकडून पोहोचत होते. यामुळे भारतीय हवाई संरक्षण व्यवस्थेवर मोठा भार आला.
भविष्यात आपल्या नागरी भागांवरही हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता, भारताने अधिक मजबूत हवाई संरक्षण व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
लेफ्टनंट जनरल सिंग यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने 21 लक्ष्यांची यादी तयार केली होती, त्यापैकी 9 ठिकाणांवर निःपक्षपातीपणे हल्ला करण्याचा निर्णय अंतिम दिवशी घेतला गेला. "ही कारवाई एकत्रितपणे तीनही लष्करी दलांनी केली. जेणेकरून भारताचे एकात्मिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन होईल," असेही त्यांनी सांगितले.
"सैन्य कारवाई सुरू केल्यावर, उद्दिष्ट साध्य झाल्यावर ती वेळेत थांबवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. युद्ध सुरू करणे सोपे असते, पण थांबवणे फार कठीण असते. म्हणूनच, हे युद्ध योग्य वेळी थांबवणे हे एक उत्कृष्ट धोरणात्मक पाऊल होते," असेही ते म्हणाले.
10 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या 11 हवाई तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानचा DGMO भारतीय समकक्षांकडे तहासाठी संपर्क साधला. दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासाठी एक समज झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की, ऑपरेशन सिंदूर फक्त ‘पॉज’ (विराम) मध्ये आहे – संपलेले नाही.