
Lalit Modi Vijay Mallya London party viral video singing I Did It My Way
लंडन : भारतातून फरार असलेले दोन मोठे उद्योगपती – ललित मोदी आणि विजय मल्ल्या – यांनी लंडनमध्ये झालेल्या एका भव्य पार्टीमध्ये एकत्र येत फ्रँक सिनात्रा यांचं प्रसिद्ध गाणं "I Did It My Way" गायले आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ ललित मोदी यांनी स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मोदी आणि मल्ल्या दोघेही स्टेजवर उभं राहून आत्मविश्वासाने आणि आनंदात गाणं सादर करताना दिसतात.
त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही, उलट त्यांच्या शरीरभाषेत एक उत्साह आहे. ते दोघेही जे गाणं गात आहेत त्या गाण्याचे शब्दही आय डीड इट माय वे - मी माझ्या पद्धतीने केलं... किंवा मी मला पाहिजे तसा जगलो... असा होतो. मी माझ्या म प्रकारचा "आम्ही काहीही करून जगलो" असा संदेश दिसतो.
ही पार्टी ललित मोदी यांनी आयोजित केली होती आणि त्यात जवळपास 310 खास पाहुणे सहभागी झाले होते. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह, आंतरराष्ट्रीय मित्रपरिवार होता. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलदेखील या पार्टीत उपस्थित होता.
गेलने एक फोटो पोस्ट करत लिहिलं: "We living it up. Thanks for a lovely evening." यामध्ये त्याने मोदी आणि मल्ल्याला टॅग देखील केलं.
ललित मोदी हे इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे पहिले आयुक्त होते. 2010 पासून त्यांनी स्वत:ला यूकेमध्ये स्थायिक करून घेतलं आहे.
त्यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप आहेत. त्यामध्ये करारांमध्ये अपारदर्शकता, आर्थिक गैरव्यवहार, बिड रिगिंग, मनी लॉन्डरिंग, परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन असे आरोप आहेत.
किंगफिशर एअरलाईन्स आणि युनायटेड ब्रुव्हरीज या कंपन्यांचे माजी प्रमुख विजय मल्ल्या हे "King of Good Times" म्हणून ओळखले जात. मात्र त्यांच्या विरुद्ध 9000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचे, आर्थिक फसवणुकीचे, मनी लॉन्डरिंगचे आरोप आहेत.
भारताने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी यूकेमध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या ते जामिनावर आहेत आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची केस अद्यापही सुरू आहे. त्यांनी आरोप नाकारले असून हे सर्व राजकीय हेतूनं केले जात असल्याचं म्हणणं आहे.
दरम्यान, 'I Did It My Way' हे गाणं ऐकताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहता, अनेकांनी याला एक प्रकारचा ‘विनोदात्मक विरोध’ आणि भारताच्या न्याय व्यवस्थेला एक प्रकारचं आव्हान असं मानलं आहे. नेटीझन्सनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
"दोन आरोपी लोकं देशाबाहेर मजा करतायत, आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे."
"न्याय कुठे आहे?"
"हा व्हिडिओ पाहून 'माय वे' खरंच म्हणजे काय, हे कळलं!"
अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.
भारतामध्ये गंभीर आर्थिक गुन्ह्यांमध्ये अडकलेले ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा लंडनमधील हा भव्य जल्लोष अनेक प्रश्न निर्माण करतो.
सामान्य नागरिक आणि कर्जदारांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे दोन उद्योगपती देशाबाहेर ऐशारामात राहत असताना, त्यांच्या विरुद्धच्या न्यायप्रक्रियेचा वेग आणि परिणामकारकता यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.