

Korean Lover Game Controversy: गाझियाबादमधील भारत सिटीमध्ये रात्री उशिरा जवळपास २ वाजून ३० मिनिटांनी निशिका (१६), प्राची (१४), पाखी (१२) या तीन सख्ख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. या तिघींनी हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या पालकांसाठी एक नोट देखील लिहून ठेवली होती.
दरम्यान, चेतन कुमार यांच्या या तीन मुली कोरियन लव्हर नावाच्या एका ऑनलाईन गेमच्या चाहत्या असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात या जीवघेण्या गेमचे त्यांना व्यसन लागले होते अशी माहिती समोर आली आहे. या तीन बहिणींनी आपलं जीवन संपवण्यामागे हा गेमच असल्याचं मानलं जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी कुटुंबियांकडे आणि मोबाईल फोनचा तपास सुरू केला आहे.
तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या तीन सख्ख्या बहिणी या डिजीटल जगातच जगायच्या. त्या कोरियन गेममधील एक टास्क पूर्ण करत होत्या. पोलीस आता त्यांच्या मोबाईलमधील पुरावे गोळा करत आहेत. असे कोणते टास्क होते ज्यामुळे या निष्पाप मुलींनी इतके टोकाचे पाऊल उचलले.
सध्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना मोबाईलमधील हा अदृष्य गेम तीन मुलींचा जीव घेईल याच्यावर विश्वासच बसत नाहीये. गाझियाबादमधील पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास करत आहेत.
हा एक ऑनलाइन, टास्क-आधारित इंटरएक्टिव्ह गेम असल्याचे सांगितले जाते. PUBG किंवा Minecraft सारख्या मुख्य प्रवाहातील खेळांसारखा हा प्रसिद्ध नसला तरी, हे एक विशिष्ट प्रकारचे ॲप किंवा प्लॅटफॉर्म आहे जिथे वापरकर्त्यांना विविध 'आव्हाने' (Challenges) किंवा 'टास्क' (Tasks) दिले जातात.
हा गेम प्रामुख्याने अशा किशोरवयीन मुलांना आकर्षित करतो जे कोरियन संस्कृती, के-पॉप (K-pop) किंवा कोरियन ड्रामा (K-dramas) यांच्या प्रेमात आहेत किंवा त्यांच्याबद्दल कमालीचे वेडे आहेत.
यामध्ये वापरकर्त्यांना 'रोल-प्ले' (विशिष्ट भूमिका निभावणे) करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गाझियाबाद प्रकरणातील मुलींच्या बाबतीत असे समोर आले आहे की, त्या स्वतःला 'कोरियन राजकन्या' (Korean Princesses) समजू लागल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्येही त्यांनी आपण भारतीय नसून कोरियन असल्याचा उल्लेख केला होता.
मृत बहिणींच्या वडिलांनी चेतन कुमार यांनी सांगितलं की, 'माझ्या मुली कोरियन गेम खेळत होत्या. काल त्यांचा शेवटचा टास्क होता. पोलिसांनी तपासासाठी त्यांचा फोन आपल्यासोबत नेला आहे. गेममध्ये एकूण ५० टास्क होते. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी शेवटचा टास्क होता. नवव्या मजल्यावरून उडी मारण्यासाठी या मुलींनी दोन स्टेपच्या शिडीचा वापर केला होता.
मध्यरात्रीच्या शांत वातावरणात अचानक किंचाळ्यांनी अख्खी सोसायटी जागी झाली. तीन बहिणींचा एकाचवेळी मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांना एका पानावर लिहिलेली नोट मिळाली आहे. त्यात फक्त मम्मी पापा सॉरी असं लिहिलं होतं. हे सोपे शब्द त्यांच्यावरील मानसिक दबावाकडे इशारा करतात. गेममधील टास्कमुळे हा मानसिक दबाव तयार झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
या प्रकरणी एसीपी अतुल कुमार यांनी सांगितलं की, 'रात्री २.१५ मिनिटांनी पीआरव्हीद्वारे भारती सिटीमधील टॉवर बी - १ फ्लॅट नंबर ९०७ मधून नवव्या मजल्याच्या बालकनीमधून तीन मुलींनी उडी मारून जीव दिल्याची माहिती मिळाली होती. पोलिस त्वरित घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी तीनही मुलांनी रूग्णालयात नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आता पोलिसांकडून या प्रकरणी पुढची कारवाई करण्यात येत आहे.