Cash Recovery : नोटा मोजणारे मशीनही थकले! माजी सरकारी ड्रायव्हरकडे २८ कोटींची कॅश, १५ किलो सोनं; घबाड पाहून यंत्रणा हादरली!

५ नोटा मोजणी यंत्रे पडली बंद, प. बंगाल पोलिसांची कारवाई ठरली सर्वात मोठ्या जप्‍तीपैकी एक
Cash Recovery
Cash Recovery : पश्‍चिम बंगाल पोलिसांनी जप्‍त केलेल्‍या रोकड असणार्‍य बॅग व सोने.
Published on
Updated on

West Bengal cash recovery : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातून एक धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका माजी सरकारी बस चालकाच्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल २८.५ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १५ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयाकडून ५० कोटींची रोकड आणि ५ किलो सोनं जप्त केल्यानंतर, राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

माजी बस ड्रायव्‍हरच्‍या घरावर छापा

मिनार मोंडल हा पूर्वी सरकारी बस ड्रायव्हर होता. तो दगड व्यावसायिक (स्टोन ट्रेडर) टुलू मोंडलचा नातेवाईक आहे. टुलू मोंडल हा तृणमूल काँग्रेसचे माजी नेते अनुब्रत मोंडल यांचा अत्यंत जवळचा साथीदार मानला जातो. अनुब्रत मोंडल यांनी नुकताच रितब्रत बॅनर्जी यांच्या बंडखोर गटात प्रवेश केला होता. जप्त केलेल्या १५ किलो सोन्याचे बाजारमूल्य सुमारे २१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

रोकड आणि सोनं बेकायदेशीर असल्‍याची आरोपीची कबुली

या मोठ्या जप्तीनंतर पोलिसांनी मिनार मोंडलला अटक केली आहे. "ही रोकड आणि सोनं टुलू मोंडल आणि त्याच्या बेकायदेशीर सिंडिकेटचे आहे," अशी कबुली मिनारने पोलिसांसमोर दिली आहे.

Cash Recovery
Crime News : प्रियकराच्या मदतीने दारूमधून विष देऊन पतीचा 'गेम'; १५ फूट खोल गाडलेला मृतदेह पाहून पोलीसही हादरले!

बुधवारी रात्री धाड, सकाळी 28कोटींहून अधिक रकमेचा खुलासा

बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई सुरू केली. सुरुवातीला पोलिसांच्या हाती ५.५ कोटी रुपये लागले होते. मात्र, आज (दि. ३० जुलै) सकाळपर्यंत हा आकडा २८ कोटींच्या पार गेला. मिनार मोंडल हा दगड व्यवसायाशी जोडलेला असून टुलू मोंडलच्या मालकीच्या स्टोन क्रशिंग युनिट्स आणि खाणींशी त्याचे थेट कनेक्शन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम त्याच्याकडे कशी आणि कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत.या संपूर्ण कारवाईदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. तथापि, ही धाड नेमक्या कोणत्या कारणासाठी टाकण्यात आली किंवा याचा संबंध बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही.

भ्रष्टाचाराविरोधात धडक कारवाई : मुख्‍यमंत्री शुभेंदू अधिकारी

पश्चिम बंगालचे मुख्‍यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी या कारवाईबाबत पोलिसांचे कौतुक केले आहे. त्‍यांनी आपल्‍या 'X'पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "वाळू माफिया आणि अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणाऱ्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांचे अभिनंदन. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बीरभूम पोलिसांनी महंमद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध माफिया टुलू मोंडल उर्फ मोहम्मद नाजीबुद्दीनच्या अड्ड्यावर मोठी धाड टाकली. यात कोट्यवधींचे अवैध साम्राज्य उघड झाले आहे.सार्वजनिक संपत्तीची लूट करून आणि सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने ज्यांनी माया जमवली आहे, अशा कोणालाही सोडले जाणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध आमची कारवाई अशीच सुरू राहील," असा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

Cash Recovery
CRPF Chief statement : 'निर्भयपणे काम करा': 'पॅलेट गन्स' वापरावर वाद सुरु असतानाच CRPF प्रमुख नेमकं काय म्‍हणाले?

रोकड सापडल्‍यानंतर तृणमूलमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

या छाप्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत गोटात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. दोन्ही गट एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. तृणमूलचे आमदार कुणाल घोष यांनी म्‍हटलं की, "काही नेते अचानक 'चांगले तृणमूल' बनले आहेत, ते केवळ ही काळी संपत्ती लपवण्यासाठीच का, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या घरी पैसे सापडले ते अशाच नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिसांनी या नेत्यांची कडक चौकशी केली पाहिजे." तर तृणमूलचे खासदार कल्‍याण बॅनर्जी यांनी कुणाल यांना प्रत्‍युत्तर देताना म्‍हटलं की, "बीरभूम हा एका माजी मंत्र्याचा आणि 'बीरभूमच्या टायगर'चा बालेकिल्ला मानला जात होता. तिथे दुसऱ्या कोणाला प्रवेशच नव्हता. आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या आरोपींचे बड्या नेत्यांशी असलेले कनेक्शन उघड करावे."

Cash Recovery
Anti Paper Leak Bill 2026 : लोकसभेत गदारोळात परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर

आरोपी मुलीच्या लग्नात १०० कोटींचा खर्च, बॉलिवूड कलाकारांची हजेरी

या जप्तीनंतर बेकायदेशीर रोकड व सोने प्रकरणातील आरोपी टुलू मोंडलच्या २०२४ मधील एका भव्य दिव्य लग्नाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टुलूने बीरभूममधील सुरी येथे आपल्या मुलीचे लग्न आयोजित केले होते. यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या शाही विवाहाला अरबाज खान, जरीन खान, अंकुश हाजरा आणि दर्शना बानिक यांसारख्या बॉलिवूड आणि बंगाली कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या पोलीस मिनार मोंडलच्या उत्पन्नाचे मूळ स्रोत शोधत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news