

CRPF Chief statement : "मी तुम्हा सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की; मग ते ऑपरेशन्सचे बटालियन असो किंवा कायदा-सुव्यवस्थेची टीमचे तुम्ही निर्भयपणे काम करा. तुम्ही कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना घेतलेले निर्णय आणि केलेल्या कारवाईचे जबाबदारी मी घेतो. जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्वीकारण्याची गरज भासेल, तिथे महासंचालक म्हणून मी ती जबाबदारी घेईन," असे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले. CRPF पदक प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत पेपर फुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सीआरपीएफचे दंगल नियंत्रण पथक असलेल्या 'रॅपिड ॲक्शन फोर्स'ची (RAF) आंदोलकांशी चकमक झाली होती. या आंदोलनादरम्यान 'पॅलेट गन्स' वापर करण्यात आला होता. यावेळी पोलीस दलाने प्रमाणापेक्षा जास्त बळाचा वापर केल्याची टीकाही झाली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना महासंचालक सिंह म्हणाले, "सीआरपीएफचा महासंचालक म्हणून मी तुम्हा सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की, मग ते ऑपरेशन्सचे बटालियन असो किंवा कायदा-सुव्यवस्थेची टीम; तुम्ही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना जे काही निर्णय घ्याल आणि जी काही कारवाई कराल, त्या सर्व निर्णयांची आणि कृतींची जबाबदारी मी घेतो."
सीआरपीएफचा कार्यविस्तार संपूर्ण देशभरात असून, राज्य पोलिसांच्या सहकार्याने कोणत्याही विविध आणि कठीण परिस्थितीशी तातडीने जुळवून घेण्याच्या क्षमतेसाठी हे दल ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत जनता आणि राज्य प्रशासनाकडून सर्वाधिक 'स्वीकारले गेलेले' आणि विश्वासू दल म्हणून सीआरपीएफने आपली प्रतिमा निर्माण केली आहे, असेही ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी नमूद केले.
ईशान्य भारतातील काही भागांमधील बंडखोरांविरोधात, तसेच मध्य भारतातील नक्षलवाद्यांविरोधात लढण्यात या दलाचे मोठे योगदान राहिले आहे. सीआरपीएफच्या 'कोब्रा' (CoBRA) बटालियनने गनिमी काव्याने आणि जंगलातील मोहिमांमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध यशस्वी कारवाया केल्या आहेत.सीआरपीएफ जवान अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत काम करतात, जिथे एका छोट्याशा चुकीलाही वाव नसतो.यापूर्वी, नोव्हेंबर २०२४ मध्ये मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात आसाम सीमेजवळ एका गावावर हल्ला करणाऱ्या १० संशयित कुकी बंडखोरांना सीआरपीएफने चकमकीत ठार केले होते. ही कारवाई काहीशी वादग्रस्त ठरली होती, कारण कुकी समुदायाने हे लोक 'ग्रामसुरक्षा स्वयंसेवक' असल्याचा दावा केला होता, तर पोलिसांनी ते बंडखोर असल्याचे सांगितले होते.