

PM Narendra Modi phone call to Iran President after US attack
नवी दिल्ली : जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रायल-इराण संघर्षाने आता अतिशय धोकादायक वळण घेतले आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशिकयान यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, "मी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशिकयान यांच्याशी चर्चा केली. आम्ही संपूर्ण प्रादेशिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि वाढत्या तणावाबाबत आमची चिंता व्यक्त केली."
मोदींनी स्पष्टपणे कळवले की, “मी शांतता आणि स्थिरतेसाठी राजनैतिक संवाद आणि चर्चा यांनाच प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. कोणत्याही मुद्द्याचे समाधान युद्ध किंवा संघर्षाद्वारे नव्हे, तर संवादाद्वारेच शक्य आहे.”
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने जोरदार प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी सूड घेण्याचे संकेत दिले आहेत. अनेक इराणी नेत्यांनी ही कारवाई "युद्ध पुकारण्यासारखी" असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण मध्य-पूर्व क्षेत्रात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारताने पुन्हा एकदा आपल्या परराष्ट्र धोरणानुसार शांतता, संवाद आणि स्थिरतेचा मार्ग स्वीकारत संयमाची भूमिका घेतली आहे. भारत नेहमीच अशा संघर्षांमध्ये तटस्थ भूमिका घेऊन संवादाचे महत्त्व अधोरेखित करत आला आहे.
रविवार (22 जून) रोजी अमेरिकेने इराणमधील महत्वाच्या अणुऊर्जा केंद्रांवर (Fordow, Natanz आणि Isfahan) हवाई हल्ले केले. यामुळे संपूर्ण मध्य-पूर्व क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून हे हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेचा इराणवरील हल्ला आणि इराणकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तणाव निर्माण झाला आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व शांततेचा संदेश देत असून, पंतप्रधान मोदींची राष्ट्राध्यक्ष पजशिकयान यांच्याशी झालेली चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.