

Salman Khan brain aneurysm
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान याने नुकत्याच त्याला झालेल्या असाध्य रोगाचा खुलासा केला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या सीझनमध्ये पहिला पाहुणा म्हणून सलमान आला होता. त्यावेळी त्याने या आजाराबाबत खुलासा केला.
तथापि, वयाच्या 59 व्या वर्षीही सलमान अतिशय तंदुरुस्त दिसत असला तरी त्याच्या या फिटनेसच्या मागे आरोग्याचं एक मोठं संकट लपलेलं आहे. आणि हे त्यानेच या शोमध्ये उघड केलं.
कॉमेडीस्टार कपिल शर्माने सलमानला त्याचं वैवाहिक आयुष्य, लग्न याबाबत विचारले असता सलमान म्हणाला, “लग्न, घटस्फोट... हे सगळं खूप इमोशनल आणि फायनान्शियल टोल घेतं. पुन्हा सगळं सुरुवातीपासून सुरू करणं सोपं नसतं.”
याच संवादादरम्यान त्याने आपल्या आरोग्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. सलमान म्हणाला की, “आम्ही काम करत असताना दररोज हाडं मोडून घेतो. बरगड्या तुटतात.
ट्रायजेमिनल न्यराल्जिया झाला आहे. त्यासोबतच काम करत आहे. मेंदुत अॅन्युरिझम झालेला आहे. तरीही काम करत आहे. AV मॉलफॉर्मेशन आहे तरीही सगळं काम करत आहे.”
ब्रेन अॅन्युरिझम – मेंदूमधील रक्तवाहिनीत एखाद्या ठिकाणी भिंत कमकुवत झाल्यास ती फुगते, जणू काही बलूनसारखी. हा फुगवटा फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होतो आणि ते जीवघेणे ठरू शकते.
AV मॉलफॉर्मेशन (Arteriovenous Malformation) – ही एक दुर्मिळ स्थिती असून यात धमणी (artery) थेट शिरेशी (vein) जोडली जाते आणि मधले केशिकांचे (capillaries) जाळे गायब असते. यामुळे मेंदू किंवा मज्जासंस्थेतील रक्तप्रवाह विस्कळीत होतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.
सलमानने 2017 मध्ये दुबईमध्ये ‘ट्युबलाईट’च्या प्रमोशनवेळी ट्रायजेमिनल न्युराल्जिया बद्दल उघडपणे सांगितलं होतं. चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर परिणाम करणारा हा आजार अत्यंत वेदनादायक असतो. सलमान म्हणतो की, “हा आजार इतका भयंकर वेदना देतो की अनेकांना आत्महत्या करावी वाटते. म्हणूनच याला ‘सुसाईड डिसीज’ म्हणतात.”
तरीही काम थांबवले नाही...
सलमान पुढे म्हणाला, “माझ्या आयुष्यात हे सगळं चालू आहे. आणि जेव्हा उपरवाल्याचा मूड सटकेल तेव्हा तो माझ्यातले अर्ध काहीतरी घेऊन जाईल. हे तरुणपणी घडलं असतं, तर काही वाटलं नसतं. पुन्हा कमावलं असतं. पण आता... सगळं पुन्हा नव्याने सुरू करणं अवघड आहे.”
सलमान खानचा संघर्ष केवळ पडद्यावरच नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही सुरू आहे. इतक्या गंभीर आरोग्य समस्या असूनही तो आजही काम करत आहे – आणि तेही कोणतीही तक्रार न करता. त्याच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला सलाम, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दरम्यान, सलमान खानने ज्या आजारांची माहिती दिली आहे, ते गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याच्यासारख्या व्यक्तीकडून हे ऐकणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं, पण अशा स्थितीत त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.