

UN Peacekeepers
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांकडून (UN) शुक्रवार दि. ५ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय शांतिसैनिक दिना’निमित्त दोन भारतीय शांतिसैनिकांचा मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिल्याबद्दल त्यांना प्रतिष्ठेचे ‘डॅग हॅमर्स्कजोल्ड मेडल’ प्रदान केले जाणार असून, भारतीय लष्कराच्या मेजर अभिलाषा बराक यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
काँगो प्रजासत्ताकातील संयुक्त राष्ट्र स्थिरीकरण मोहिमेत कार्यरत असलेले लान्स हवालदार हरभजन सिंग आणि दक्षिण सुदानमधील UN मिशनमध्ये नियुक्त नायब सुभेदार सुजीत कुमार प्रधान यांना संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या हस्ते मरणोत्तर ‘डॅग हॅमर्स्कजोल्ड मेडल’ प्रदान करण्यात येईल.
याच कार्यक्रमात मेजर अभिलाषा बराक यांना ‘2025 मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलात सेवा बजावताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव होणार आहे. भारतीय लष्करातील पहिल्या महिला कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर बराक सध्या ‘फीमेल एंगेजमेंट टीम’च्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत.
या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या मानकरी ठरणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय अधिकारी आहेत. यापूर्वी मेजर सुमन गवानी आणि मेजर राधिका सेन यांनाही संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सेवा बजावताना आतापर्यंत जवळपास १८० भारतीय शांतिसैनिकांनी बलिदान दिले आहे. कोणत्याही देशाच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक मानला जातो.
सध्या भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा योगदानकर्ता देश आहे. भारतीय लष्कर आणि पोलिस दलातील ४ हजार २०० हून अधिक जवान विविध UN मोहिमांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये १५५ महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अबियेई, सायप्रस, काँगो, लेबनॉन, सोमालिया, दक्षिण सुदान आणि वेस्टर्न सहारा येथे भारतीय जवान सेवा बजावत आहेत.