

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तान आणि बांगला देश सीमेलगतच्या सुमारे सहा हजार किलोमीटर भागात पुढील एका वर्षात ‘स्मार्ट बॉर्डर’ सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. या अंतर्गत ड्रोन, रडार, स्मार्ट कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सीमांवर चोवीस तास नजर ठेवली जाणार असून घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी व्यापक सुरक्षा जाळे उभारले जाणार आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित रुस्तमजी मेमोरियल लेक्चर आणि बीएसएफ इन्व्हेस्टिचर समारंभात ते बोलत होते. यावेळी शहा यांनी अवैध घुसखोरीविरोधात केंद्र सरकारची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका असल्याचे स्पष्ट केले. देशातील प्रत्येक अवैध घुसखोराची ओळख पटवून त्यांना परत पाठवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अमित शहा म्हणाले, अवैध घुसखोरी हा केवळ सीमा सुरक्षेचा विषय नसून देशाच्या लोकसंख्यात्मक संतुलनाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. सीमावर्ती भागांतील लोकसंख्येतील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ सुरू करणार आहे.
अमित शहा यांनी बीएसएफ जवानांच्या शौर्य आणि बलिदानाचे कौतुक करताना, 1965 मध्ये 25 बटालियनपासून सुरू झालेली ही संघटना आज 2.70 लाख जवानांसह जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल बनल्याचे सांगितले. कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा बजावणार्या आणि सर्वोच्च बलिदान देणार्या जवानांचा गौरवही करण्यात आला.
शहा म्हणाले, स्मार्ट बॉर्डर प्रकल्पांतर्गत संवेदनशील सीमावर्ती भागांमध्ये अत्याधुनिक उपकरणे तैनात केली जाणार आहेत. ड्रोन आणि रडारच्या मदतीने सतत हवाई निरीक्षण केले जाईल, तर स्मार्ट कॅमेर्यांच्या सहाय्याने संशयास्पद हालचालींवर तत्काळ लक्ष ठेवले जाणार आहे. बीएसएफच्या स्थापनेच्या 60व्या वर्षात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
शहा म्हणाले, देशात ज्या पद्धतीने नक्षलवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे घुसखोरीविरोधातही कठोर उपाययोजना केल्या जातील. केवळ समस्या नियंत्रणात ठेवणे पुरेसे नसून तिचे मुळापासून उच्चाटन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा या सीमावर्ती राज्यांच्या सरकारांशी समन्वय साधून घुसखोरी आणि पशुतस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहे. यासाठी राज्य पोलिस, जिल्हा प्रशासन आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय वाढवा, असे आवाहन शहा यांनी बीएसएफ जवानांना केले.