

Army Helicopter Crash Leh
लेह: लडाखमधील लेह जवळील तांगस्ते या डोंगराळ भागात भारतीय लष्कराचे 'चिता' हेलिकॉप्टर कोसळले. या भीषण अपघातातून लष्कराचे मेजर जनरल आणि दोन वैमानिक थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. बुधवारी झालेली ही घटना आज समोर आली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सिंगल इंजिन हेलिकॉप्टरमध्ये ३ इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल सचिन मेहता हे प्रवास करत होते. तर हेलिकॉप्टरचे नियंत्रण एका लेफ्टनंट कर्नल आणि एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याकडे होते. तांगस्ते भागात हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तत्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सुदैवाने तिघांनाही गंभीर दुखापत झालेली नाही.
'चिता' आणि 'चेतक' हेलिकॉप्टर्स निवृत्त होणार
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या ताफ्यातील जुन्या होत चाललेल्या हेलिकॉप्टर्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक ते दोन वर्षांत 'चिता' आणि 'चेतक' हेलिकॉप्टर्सचा ताफा टप्प्याटप्प्याने सेवेतून निवृत्त करण्यात येणार आहे. पुढील ८ ते १० वर्षांत त्यांच्या जागी आधुनिक हेलिकॉप्टर्स समाविष्ट केले जातील.
लष्कराला सध्या सुमारे २५० नवीन हेलिकॉप्टर्सची आवश्यकता आहे. यासाठी दुहेरी रणनीती आखण्यात आली असून, स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यासोबतच तातडीची गरज भागवण्यासाठी काही हेलिकॉप्टर्स भाडेतत्त्वावर घेण्याचा लष्कराचा विचार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी किमान १८७ लाईट हेलिकॉप्टर्सची संयुक्त ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. लष्कराने यापूर्वीच 'लिमिटेड सिरीज प्रॉडक्शन' अंतर्गत ६ एलयूएच हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली आहे. ताशी २२० किमी वेग, ६.५ किमी उंचीवर उडण्याची क्षमता आणि ३५० किमीची ऑपरेशनल रेंज ही या नव्या हेलिकॉप्टर्सची वैशिष्ट्ये आहेत.