

सध्या आधार कार्डवरील जन्मतारीख , नाव किंवा पत्ता यांसारख्या तपशिलांमधील बदलासाठी आधार सेवा केंद्राला भेट देणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. आता नवीन ई-आधार ॲप्लिकेशन (e-Aadhaar Application) सुरु झाल्यानंतर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल.
E-Aadhaar app : आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच 'ई-आधार' (e-Aadhaar) नावाचे एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्याच्या तयारीत आहे. ‘ऑल-इन-वन’ ॲपचा उद्देश नागरिकांना त्यांची आधार माहिती सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने अपडेट करण्याची सुविधा प्रदान करणे हा आहे. हे ॲप नानगरिकांना स्मार्टफोनवरून वैयक्तिक तपशील अपडेट करण्यास मदत करेल. तसेच कोणत्याही किरकोळ बदलांसाठी नागरिकांना आधार केंद्रांवर (Aadhaar Centres) जाण्याची गरज राहणार नाही.
सध्या जन्मतारीख (Date of Birth), नाव (Name) किंवा पत्ता (Address) यांसारख्या आधार तपशिलांमध्ये बदल करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट देणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. आता या नवीन ई-आधार ॲप्लिकेशन (e-Aadhaar Application) सुरु झाल्यानंतर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल. वापरकर्ते ॲपच्या माध्यमातून घरबसल्या जन्मतारीख, नाव, पत्ता, फोन नंबर याचातील बदल करु शकतील.
E-Aadhaar app सरकारच्या अधिकृत माहिती प्रणालीशी जोडले जाईल. यामुळे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि जन्म प्रमाणपत्रे यांसारख्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे स्वयंचलित प्रमाणीकरण करणे शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आधार कार्ड अपटेड करणे जलद तर होईलच, पण डेटा त्रुटी आणि फसवणूक होण्याची शक्यताही कमी होईल.
सध्या लाखो भारतीयांचा आधार डेटा फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडण्याची शक्यता असते. आता 'युआयडीएआय'वापरकर्त्यांना सुरक्षितपणे प्रमाणित (Authenticate) करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि चेहरा ओळख तंत्रज्ञान एकत्रित करण्याची योजना आखत आहे. केवळ वैध वापरकर्तेच त्यांच्या प्रोफाइलमध्ये बदल करू शकतील. तसेच ई आधार ॲप्लिकेशनमुळे वेळेची बचत होईल, प्रत्यक्ष केंद्रांपर्यंत जाण्याचा प्रवासाचा खर्च कमी होईल.
रिपोर्टनुसार, ई-आधार ॲप (e-Aadhaar App) 2025 च्या अखेरीस Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे ॲप लाँच झाल्यानंतर डिजिलॉकर (DigiLocker) आणि उमंग (UMANG) यांसारख्या प्लॅटफॉर्म्सना पूरक ठरणार आहे.