

Nagpur News
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील लता मंगेशकर रुग्णालय सध्या एका अत्यंत खळबळजनक आणि गंभीर घटनेमुळे चर्चेत आले आहे. गेल्या २५ दिवसांच्या आत येथे नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चारही मातांची प्रसूती ॲाक्टोबर महिन्यात झाली होती आणि त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
ॲाक्टोबर महिन्यात ज्या चार महिलांची प्रसूती सिझर पद्धतीने झाली होती, त्यांचा प्रसुतीनंतर काही दिवसांतच मृत्यू झाला. सिझर झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांच्या आतच या महिलांनी जीव गमावला. दुर्दैवी बाब म्हणजे, या मातांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, ज्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हॉस्पिटलमध्ये 22 दिवसांत चार माता मृत्यू झाल्याच्या घटनेने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. औषधांचे नमुने तपासणीसाठी अन्न औषध प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत.विशेष म्हणजे 9 महिन्यात येथे माता मृत्यूची एकही नोंद नाही. मात्र ८ ते 30 ऑक्टोबर 22 दिवसात चार माता मृत्यू झालेत. यात हिंगण्यातील दोन, खापरी येथील एक आणि गडचिरोलीमधील एका महिलेचा समावेश आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत एक विशेष चौकशी समिती लतामंगेशकर रुग्णालयात दाखल झाली. समितीने या मातांच्या मृत्यूची नेमकी कारणे आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. समितीने शस्त्रक्रिया विभागाचे नमुने घेऊन चौकशीसाठी पाठवले आहेत.
शासनाने या प्रकाराची गंभीर दाखल घेतली असून आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ श्रीराम गोगलवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीत स्त्री रोग तज्ञ, जिल्हा बालसंगोपन अधिकारी, मेडिकल,मेयो हॉस्पिटल मिळून एकंदर अशा आठ जणांचा समावेश आहे.