

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संघातून वगळण्यात आले. या निर्णयावर भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जोरदार टीका केली आहे. तसेच अर्शदीपला खेळवले नाही तर त्याची प्रतिभाच कोमेजेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
India vs Australia R Ashwin slams Team India : मेलबर्नमध्ये शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-20 मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात भारताला नामुष्कीजनक पराभवाला सामारे जावे लागले. १८.४ षटकांत टीम इंडियाचा डाव १२५ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियाने फक्त १३.२ षटकांत चार विकेट्स गमावत विजय आपल्या नावावर केला. या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू आर अश्विनने संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने म्हणाला की, "संघ व्यवस्थापनाला प्रयोग करायचे असतील तर अर्शदीपला नाही तर जसप्रीत बुमराहला विश्रांती द्यायला हवी होती. बुमराहला कामाच्या व्यवस्थापनाच्या समस्या आहेत. तुम्ही बुमराहला विश्रांती देऊ शकता."
अर्शदीप सिंग हा टी-20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. अशा गोलंदाजाला तुम्ही संघात घेत नाही हे खूप दुःखद आहे. सध्या टी-20 फॉर्मेटमध्ये अर्शदीप सिंग टॉपला आहे. माझ्या मते बुमराह खेळत असताना अर्शदीप सिंगचे नाव तुमच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत दुसरे नाव असले पाहिजे. बुमराह खेळत नसेल, तर अर्शदीप त्या संघाच्या यादीत तुमचा पहिला पसंतीचा गोलंदाज ठरतो. अशावेळी तुम्ही अर्शदीप सिंगाचा संघातच समावेश न करणे अनाकलनीय आहे.
अर्शदीप ऐवजी हर्षिर राणाचा संघात समावेश करण्यात आला. त्याने चांगले कामगिरी केली; पण अर्शदीपला वगळल्याने संघ असमतोल झाला. २०२४ च्या टी२० विश्वचषकात अर्शदीपने उत्कृष्ट कामगिरी केली. तरीही तो सातत्याने संघाबाहेर आहे. त्याला खेळायला हवे होते तेव्हा त्याला अनेक वेळा बेंचवर ठेवण्यात आले आहे. ६५ सामन्यांमध्ये १०१ बळींसह भारताचा आघाडीचा टी२० विकेट घेणारा अर्शदीपने शेवटचा सामना २०२५ च्या आशिया कपमध्ये खेळला आहे.तुम्ही त्याला खेळायला वेळ दिला नाही तर तुमचा चॅम्पियन गोलंदाज आपली प्रतिभा गमावलेल. मला खरोखर आशा आहे की त्याला ज्या संधी मिळायला हवी. कारण तो पात्र आहे. कृपया, त्याला खेळवा." असेही अश्विनने म्हटलं आहे.