Andhra Temple Stampede : आंध्र प्रदेशातील कासीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू
Andhra Temple Stampede : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील कासीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, शनिवारी एकादशीनिमित्त मंदिरात दर्शनांसाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी रेलिंग कोसळल्याने एकच गोंधळ उडाल्याने ही दुर्घटना घडली. जखमी भाविकांना रुग्णालयात नेण्यात आले.
एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
श्रीकाकुलम वेंकटेश्वर मंदिर हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध आहे. "उत्तरेचा तिरुपती" अशी त्याची ओळख आहे. एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी रेलिंग कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे चेंगराचेंगरी झाली. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस पथके आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर लगेचच राज्याचे कृषी मंत्री के. अचन्नायडू मंदिरात पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंदिर अधिकाऱ्यांची भेट घेतली. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केला तीव्र शोक
आंध्र प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या निवेदनानुसार, एकादशी उत्सवासाठी मंदिरात मोठी गर्दी जमली होती तेव्हा चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला. अनेक भाविक जखमी झाले आणि त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीवर तीव्र शोक व्यक्त केला. "श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने धक्का बसला आहे. या दुःखद घटनेत भाविकांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो," असे नायडूंनी म्हटले आहे. जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनेच्या ठिकाणी भेट देऊन मदत उपाययोजनांवर देखरेख करण्याची विनंती केली आहे," असेही त्यांनी नमूद केले आहे.

