Jammu and Kashmir Kulgam Encounter
जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात शनिवारी (दि.९ ऑगस्ट) सलग नवव्या दिवशी चकमक सुरु आहे. काल रात्रभर या परिसरात मोठे स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. ऑपरेशन अखल (Operation Akhal) दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत, अशी माहिती भारतीय लष्कराने शनिवारी दिली. दरम्यान या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
''देशासाठी कर्तव्य बजावताना शूर सैनिक L/Nk प्रितपाल सिंग आणि हरमिंदर सिंग यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला सलाम. त्यांचे धैर्य आणि समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.'' असे Chinar Corps ने म्हटले आहे.
येथे १ ऑगस्टपासून कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच ते कोणत्या गटाशी संबंधित आहेत याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या जंगल परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान गेल्या शुक्रवारी चकमक सुरु झाली. या परिसरात घेराबंदी कडक करण्यात आली. तसेच अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशीही पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घनदाट जंगलात लपून बसलेले इतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीरचे पोलिस प्रमुख नलिन प्रभात आणि नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अखल जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि पॅरा कमांडो तैनात करण्यात आले आहेत.