India-US Tariff War | अमेरिकन कंपन्यांनी रोखल्या भारताच्या ऑर्डर्स
नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर आयात शुल्क लागू केल्यानंतर वॉलमार्ट, अॅमेझॉन, गॅप, टार्गेट या प्रमुख किरकोळ विक्रेत्या कंपन्यांनी भारताकडून येणार्या त्यांच्या ऑर्डर्स रोखल्या आहेत. तसेच भारतीय कापड निर्यातदारांनादेखील अमेरिकन खरेदीदारांनी ई-मेल पाठवून पुढील सूचना मिळेपर्यंत टेक्स्टाईल शिपमेंट थांबवण्याची विनंती केली आहे.
अमेरिकने भारतावर 25 टक्के आयात शुल्क लागू केल्यानंतर 28 ऑगस्टपासून आणखी 25 टक्के शुल्क लावले जाईल, अशी घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर त्याचे परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसू लागले आहेत.आयात शुल्कामुळे वाढलेल्या खर्चाचा भार भारतीय निर्यातदार कंपन्यांनी सोसावा, अशी अमेरिकन कंपन्यांची अपेक्षा आहे. आयात शुल्क लावल्याने अमेरिकेत जाणार्या भारतीय वस्तूंच्या किमतीमध्ये 30 ते 35 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांचीही चिंता वाढली आहे.
आयात शुल्काचा मोठा फटका भारतातील कापड निर्यातदार कंपन्यांना बसू शकतो. ट्रायडेंट, इंडो काऊंट, गोकलदास एक्स्पोर्टस् या कापड उद्योगातील मोठ्या निर्यातदार कंपन्या असून या चार कंपन्यांमधून 40 ते 70 टक्के निर्यात अमेरिकेला केली जाते. आयात शुल्कामुळे कंपन्यांच्या खर्चामध्ये 30 ते 35 टक्के वाढ होऊ शकते. तसेच अमेरिकेतून येणार्या ऑर्डर्समध्ये 40 ते 50 टक्के घटदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापड कंपन्यांचे चार ते पाच अब्ज डॉलर्स म्हणजे 35 ते 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. अमेरिका हा भारताचा कापड उद्योगातील सर्वांत मोठा आयातदार देश असून, मार्च 2025 पर्यंत 36.61 अब्ज डॉलर्सची निर्यात भारतीय कंपन्यांनी अमेरिकेला केली होती.
भारताच्या निर्यातीत मोठा वाटा
भारताच्या वस्त्र आणि तयार कपड्यांच्या (टेक्स्टाईल आणि अपेरल) निर्यातीसाठी अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून आपले स्थान कायम ठेवत आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारताने अमेरिकेला सुमारे 10 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्त्र आणि तयार कपड्यांची निर्यात केली आहे. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योगासाठी अमेरिकेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

