

TMC Leader Jahangir Khan vs IPS Ajay Pal Sharma
दक्षिण २४ परगणा : उत्तर प्रदेशचे आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांच्या इशाऱ्यानंतर पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणामध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. टीएमसी (TMC) उमेदवार जहांगीर खान यांनी शर्मा यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, "तो स्वतःला 'सिंघम' समजत असेल, तर मी 'पुष्पा' आहे."
आपल्या कडक प्रतिमेमुळे 'सिंघम' अशी ओळख असणारे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांची निवडणूक आयोगाचे निरीक्षक म्हणून नियुक्त केली आहे. जहांगीर खान यांचे सहकारी मतदारांची ओळखपत्रे गोळा करत असून त्यांना धमकावत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शर्मा तिथे पोहोचले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांच्या नातेवाईकांशी बोलताना शर्मा म्हणाले, "त्याला (जहांगीर खान) नीट समज द्या. लोकांना धमकावल्याच्या तक्रारी आल्या तर आम्ही कठोर कारवाई करू. कोणी चुकीचे काम केले किंवा मतदारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना सोडणार नाही."जहांगीरला सांगा की त्याच्या माणसांकडून लोकांना धमकावले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. हे थांबले नाही तर आम्ही गंभीर पावले उचलू."
जहांगीर खान यांनी या इशाऱ्याला आक्रमकपणे उत्तर दिले. ते म्हणाले, "हे बंगाल आहे; तो जर 'सिंघम' असेल, तर मी 'पुष्पा' आहे. भाजपच्या सांगण्यावरून फाल्टामध्ये तैनात असलेल्या उत्तर प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांची कोणतीही दादागिरी किंवा दबाव आम्ही सहन करणार नाही. ते पोलीस बळाचा वापर करून मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही व्यवस्थेत अशा कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत." खान यांनी असाही आरोप केला की, शर्मा यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात आणि घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला धमकावले.
या घटनेनंतर लागलीच फाल्टा येथील खान यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर टीएमसी समर्थकांनी गर्दी केली. शर्मा यांचा ताफा सीआरपीएफ (CRPF) वाहनांसह तिथून जात असताना समर्थकांनी 'जय बांगला'च्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी आरोप केला की, मतदानापूर्वी शर्मा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना घाबरवण्याचे काम करत आहेत.
एका महिलेने फाल्टा पोलीस ठाण्यात अजय पाल शर्मा आणि केंद्रीय दलांविरुद्ध गैरवर्तणुकीची तक्रार दाखल केल्याने हा वाद अधिकच वाढला आहे. तक्रारीनुसार, सुरक्षा रक्षकांनी रात्री घरांत घुसून महिलांशी गैरवर्तन केले. या आरोपांमुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.
टीएमसीच्या ज्येष्ठ नेत्यांनी शर्मा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पश्चिम बंगालच्या मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य म्हणाल्या, "प्रसारमाध्यमांनी त्यांना 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' असे नाव दिले आहे. असा पोलीस अधिकारी येथे काय करत आहे? तो रात्री कोणाच्याही घरी जाऊन धमकावू शकतो का? आम्ही या गोष्टीचा निषेध करतो."
हा वाद वाढल्यानंतर आणि मतदानाला केवळ एक दिवस उरला असताना निवडणूक आयोगाने फाल्टाचे जॉइंट बीडीओ (सौरव हाजरा यांची तातडीने बदली केली आहे. त्यांच्या जागी रम्या भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हाजरा हे फाल्टा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनही काम पाहत होते.फाल्टा हा भाग डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात येतो, ज्याचे प्रतिनिधित्व अभिषेक बॅनर्जी करतात. मतदानापूर्वी या भागातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.