नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रांच्या अपात्रतेबाबतचा लोकसभेच्या नैतिक आचरण विषयक समितीचा (एथिक्स कमिटी) अहवाल मांडायला आता हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम टप्प्याचा मुहूर्त लागू शकतो. संसदेत विरोधक चर्चेसाठी तयार असल्याने त्यांना या मुद्द्यावरून दुखवायचे नाही, असा पवित्रा सरकारने घेतल्याचे समजते.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती हिरानंदानींकडून पैसे व भेटवस्तू घेतल्याच्या आरोपांची चौकशी भाजप खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील नैतिक आचरण समितीने पूर्ण केली आहे. या प्रकरणात समितीने महुआ मोईत्रांना अपात्र ठरविण्याची शिफारस केल्याचेही सांगितले जात आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (४ डिसेंबर) सुरू झाले असून पहिल्याच दिवशी समितीतर्फे अहवाल मांडला जाणार होता. त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख लोकसभेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये देखील करण्यात आला होता. तर, या अहवालाला कडाडून विरोध करण्याची तयारी देखील विरोधकांनी केली होती. मात्र, अहवाल सभापटलावर मांडण्यात आला नाही. दुसऱ्यादिवशी म्हणजे आज (दि.४) अहवाल येणार असे सांगण्यात आले होते. परंतु आज लोकसभच्या दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेमध्ये अहवालाचा उल्लेख टाळण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर, सरकारच्या सुत्रांनी सांगितले की, अधिवेशन काळात सरकारला महत्त्वाची विधेयके संमत करायची आहेत आणि विरोधी पक्षांनीही विधेयके मंजुरीत सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच महागाई, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, केंद्र-राज्य संबंध यासारख्या मुद्द्यांवर चर्चेची मागणीही विरोधकांची आहे. मागील काही अधिवेशनात विस्कळीत झालेले संसदेचे कामकाज अखेरच्या अधिवेशनात सुरळीत चालणार असेल, तर यानिमित्ताने विरोधकांना दुखावण्याची गरज नाही, अशी सूचक टिप्पणी सुत्रांनी केली. २२ डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यातही एथिक्स कमिटीचा अहवाल स्विकारला जाऊ शकतो, असे संकेतही सुत्रांनी दिले.
हेही वाचा :