Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका मार्चमध्ये होणार? राममंदिर, ‘विधानसभां’मधील यशाच्या आधारे भाजपची निवडणुकांची रणनिती | पुढारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका मार्चमध्ये होणार? राममंदिर, ‘विधानसभां’मधील यशाच्या आधारे भाजपची निवडणुकांची रणनिती

अजय बुवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत तीन राज्ये सहजगत्या जिंकल्यानतर आता भाजपने केंद्रातील सत्तेची हॅट्रिक साध्यासाठी लोकसभा निवडणुका मार्चमध्ये घेण्याची तयारी चालविल्याचे उच्चपदस्थ सुत्रांकडून समजते. अयोध्येतील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर होणाऱ्या छोटेखानी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखानुदान मंजूर केले जाईल. त्यानंतर लगेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाऊ होऊ शकते.

लवकर होणाऱ्या निवडणुकांसाठी खासदारांकडे केवळ ६० दिवसांचा कालावधी राहू शकतो. त्यामुळे त्यांनी आपापल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना भाजपने दिल्या आहेत. सोबतच, एनडीएतील घटक पक्षांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. तीन राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशानंतर विजयाच्या लाटेत सातत्य राखण्याच्या रणनितीचा भाग म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुका काही आठवडे अलिकडे घेण्याची आखणी सुरू असल्याचे कळते. (Lok Sabha Election 2024)

विधानसभा निवडणुकांमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसमधील नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्येही गोंधळाचे वातावरण असून लोकसभेसाठी जागा वाटप, भाजपविरुद्ध एकास एक उमेदवार देण्याचा प्रस्ताव यासारख्या गोष्टी हवेतच आहे. याचा परिस्थितीत भाजपला जास्तीत जास्त यश मिळण्याची संधी असल्याचेही भाजप धुरीणांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा निवडणुकांचे यश आणि राममंदिराचा मुद्दा मतदारांच्या विस्मृतीत जाण्याआधीच त्याचा लाभ घ्यावा, तसेच गोंधळलेल्या विरोधी पक्षांना सावरण्याची संधी देण्याआधीच लोकसभा निवडणुका घ्याव्यात या रणनितीवर गांभीर्याने विचार भाजपमध्ये सुरू आहे. त्यामुळे, कोणतीही अडचण न आल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्यानंतर आचार संहिता लागू होऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

तत्पूर्वी, जानेवारीच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार निवडणूक वर्ष असल्याने लेखानुदान मांडेल. त्यात शेतकरी, महिलांशी संबंधित आकर्षक घोषणांचा देखील समावेश राहू शकतो. अर्थात, या या अधिवेशनाचा कालावधी अवघ्या आठवडाभराचा राहील असे संकेत मिळत आहेत.

भाजपने निवडणूक प्रचारात मोदी है तो मुमकीन है, मोदींची गॅरंटी, सत्तेची हॅट्रिक यासारखे शब्दप्रयोग लोकांपर्यंत पोहोचविले होते. यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये वाढलेल्या उत्साह, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची उंचावलेली प्रतिमा आणि राममंदिराच्या निमित्ताने मतदारांमध्ये वाढणारी धार्मिक भावना या त्रिसुत्रीच्या आधारे लोकसभेमध्ये ३५० जागा मिळविण्याचे उद्दीष्ट गाठता येईल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळेच, अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर निवडणुकांची घोषणा व्हावी, जेणे करून मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकीत राममंदिर मुद्द्याचे भांडवल करता येईल असा प्रयत्न आहे.

त्यापार्श्वभूमीवर राममंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा शहरी तसेच ग्रामीण भागांसह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी मुद्रीत, दृकश्राव्य, डिजिटल सर्व प्रकारच्या माध्यमांतून पोहोचविण्याचीही आखणी झाल्याचे समजते. १५ डिसेंबरपासून या प्रचार मोहिमेला सुरवात होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यात प्रामुख्याने तरुणाईवर लक्ष केंद्रीत केले जाणार असून ठिकठिकाणी मोदींच्या प्रतिमेसोबत सेल्फी काढण्यासाठीचे सेल्फी पॉईंट उभारण्याची आखणी करण्यात आली आहे.

मागील लोकसभा निवडणुका २०१९ मध्ये ११ एप्रिल ते १९ मे अशा महिनाभराच्या कालावधीत सात टप्प्यांमध्ये झाल्या होत्या. मात्र, हा कालावधी देशाच्या बहुतांश भागात उन्हाचा तडाखा वाढण्याचा असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होतो. त्यामुळे उन्हाचे प्रमाण कमी असलेल्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुका घेणे सोईस्कर ठरेल, असाही युक्तिवाद सत्ताधारी वर्तुळातून पुढे करण्यात येत आहे. २००४ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने इंडिया शायनिंगची घोषणा देऊन लवकर निवडणुका घेतल्या होत्या. मात्र उन्हाळ्यात कमी मतदान झाल्याचा फटका भाजपला बसला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

“…. तर धनुष्यबाण अयोध्येत जाणार”

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्षांसमोर सुरू आहे. या प्रकरणाचा अनुकूल निकाल राममंदिराच्या उद्घाटनापूर्वी लागल्यास विजयोत्सव साजरा करण्यासाठी शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटातर्फे अयोध्येला नेण्यात येईल. तसेच या निमित्ताने महाराष्ट्रात हिंदुत्ववादाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात येईल, असेही नियोजन झाल्याचे सुत्रांकडून कळते.

Back to top button