Revanth Reddy New CM of Telangana : ‘रेवंत रेड्डी’ तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, ७ डिसेंबरला शपथविधी : कॉंग्रेसची घोषणा
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयामध्ये मोलाचा वाटा असणारे रेवंत रेड्डी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री (New CM of Telangana) असतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज रेवंत रेड्डी यांची तेलंगणामधील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली. गुरुवारी (दि. ७ डिसेंबर) त्यांचा शपथविधी होईल.
कॉंग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन रेवंथ रेड्डी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याची औपचारिक घोषणा केली. यावेळी पक्षाचे तेलंगाणा प्रभारी, माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि निरीक्षक डीके शिवकुमार, तेलंगणातील नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, एन. उत्तम कुमार रेड्डी उपस्थित होते. (Revanth Reddy New CM of Telangana)
वेणुगोपाल म्हणाले, की हैदराबादमधे कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक काल झाली होती. त्यात विधीमंडळ पक्षनेता निवडीचे सर्वाधिकार अध्यक्ष खर्गे यांना सोपविण्यात आले होते. त्यानंतर निरीक्षक डीके शिवकुमार, प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे रेवंथ रेड्डी यांची कॉंग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घेतला. तेलंगणातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याला आणि कॉंग्रेसने दिलेली गॅरंटी आश्वासने पूर्ण करण्याला नव्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असाही दावा वेणुगोपाल यांनी केला.
तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) लिलया धूळ चारली होती. ११९ जागांच्या विधानसभेत कॉंग्रेसने ६४ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले. तर बीआरएसला ३९ जागा मिळाल्या असून भारतीय जनता पक्षाला आठ तर असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुसलमिन या पक्षाला ७ जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा
- Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका मार्चमध्ये होणार? राममंदिर, 'विधानसभां'मधील यशाच्या आधारे भाजपची निवडणुकांची रणनिती
- विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा काँग्रेसला ११ लाख मते अधिक : नाना पटोले
- Cyclone Michaung Update: मिचौंग चक्रीवादळाने आंध्रप्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडली, किनारपट्टीला धोक्याचा इशारा

