

Telangana CM Revanth Reddy
हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते ए. रेवंत रेड्डी यांनी हिंदू देव-देवता आणि पूजा पद्धतीतील विविधतेबाबत केलेल्या विधानांमुळे राज्यात मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मंगळवारी झालेल्या राज्य काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पक्षातील विविधतेची तुलना हिंदू धर्माशी केली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, "काँग्रेस सर्व प्रकारच्या व्यक्तींना एकत्र घेऊन चालते. कोणी म्हणतो मी भगवान व्यंकटेश्वराची पूजा करीन, तर दुसरा म्हणतो मी हनुमानाची पूजा करीन. आपण देवांवरच एकमत करू शकत नाही, तर राजकीय नेते आणि जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांवर सहमती होईल, असे मला वाटत नाही."
रेड्डी यांनी हिंदू धर्मातील पूजेच्या विविध पद्धती स्पष्ट करताना पुढे म्हटले, "हिंदूंसाठी किती देव आहेत? तीन कोटी? जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी हनुमान आहेत. ज्यांनी दोनदा लग्न केले आहे त्यांच्यासाठी दुसरे देव आहेत. काही कार्यक्रमांमध्ये जेथे ताडी आणि मांसाहारी पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात असे स्थानिक देव आहेत, तर 'डाळ भात' खाणाऱ्या (शाकाहारी) लोकांसाठी पूजा केले जाणारे वेगळे देव आहेत."
मुख्यमंत्र्यांचे हे विधान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीवरून पक्षात कथितरित्या सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
रेवंत रेड्डी यांच्या विधानावर तेलंगणा भाजपने तीव्र टीका केली आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि भाजपचे नेते बंदी संजय कुमार यांनी मुख्यमंत्र्यांवर हिंदुविरोधी असल्याचा आरोप केला. किशन रेड्डी यांनी निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे विधान केले होते. आता एआयएमआयएम सोबतच्या मैत्रीमुळे ते हिंदू आणि हिंदू देवी-देवतांविरुद्ध गर्विष्ठ विधाने करत आहेत. तेलंगणात आता हिंदूंनी एकत्र येऊन रेवंत रेड्डी आणि काँग्रेसला हिंदूंची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.