

Auto Sales
नवी दिल्ली : ऑटो कंपन्यांना GST कपातीचा मोठा फायदा मिळत आहे. सरकारने गाड्यांवरील GST चा दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्व एसयूव्हीपासून कारपर्यंतच्या किमतीत मोठी घट झाली. परिणामी, गाड्यांची बंपर विक्री होत आहे. नोव्हेंबर महिन्यात मारुती, टाटासह इतर गाड्यांची विक्रमी विक्री झाली आहे. नोव्हेंबरमध्ये सुमारे ४,२५,००० प्रवासी वाहनांची घाऊक विक्री झाली. यात मागील वर्षाच्या तुलनेत २०.७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
मारुती सुझुकी त्यांच्या देशांतर्गत विक्रीत २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात स्पोर्ट युटिलिटी गाड्यांसोबतच ऑल्टोसारख्या लहान कारच्या विक्रीचाही समावेश आहे. मारुतीने नोव्हेंबरमध्ये २,२९,०२१ युनिट्स विकल्यासह आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली.
नोव्हेंबर २०२५ महिंद्रासाठीही उत्कृष्ट ठरला. पॅसेंजर व्हेइकल सेगमेंटमध्ये कंपनीने चांगली कामगिरी करत देशांतर्गत बाजारात ५६,३३६ गाड्यांची विक्री केली. हा आकडा गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मधील ४६,२२२ युनिट्सपेक्षा २२ टक्के जास्त आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सची नोव्हेंबरमध्ये गतवर्षीपेक्षा २६ टक्क्यांनी वाढून ५९,१९९ युनिट्स झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने डीलर्सना ४७,११७ वाहने पाठवली होती. त्यांची देशांतर्गत बाजारातील विक्री नोव्हेंबर २०२४ मधील ४७,०६३ युनिट्सवरून २२ टक्क्यांनी वाढून नोव्हेंबर २०२५ मध्ये ५७,४३६ युनिट्स झाली.
Hyundai मोटर इंडियाच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांची घाऊक विक्री नोव्हेंबरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ४.३ टक्क्यांनी वाढून ५०,३४० युनिट्स झाली.
टोयोटानेही नोव्हेंबर २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली. नोव्हेंबरमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटरने ३०,०८५ प्रवासी वाहनांची घाऊक विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत १९.५ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये ही संख्या २५,१८२ होती.
बजाजची नोव्हेंबरमधील देशांतर्गत दुचाकी वाहनांची विक्री एक टक्क्याने घटून २,०२,५१० युनिट्स राहिली. नोव्हेंबर २०२४ मध्ये ही २,०३,६११ युनिट्स होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निर्यातीसह वाहनांची एकूण घाऊक विक्री नोव्हेंबरमध्ये आठ टक्क्यांनी वाढून ४,५३,२७३ युनिट्स झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ४,२१,६४० वाहने विकली गेली होती.