

telangana cm a revanth reddy explains with lord shiva and ram on why congress popular in south
पुढारी ऑनलाईन : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना काँग्रेस दक्षिण भारतीय राज्यांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहे, मात्र उत्तर भारतात का नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी भगवान राम आणि भगवान शिव यांचे उदाहरण दिले. तसेच त्यांनी SIR बाबतही भाष्य केले.
काँग्रेसशासित तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस दक्षिण भारतीय राज्यांमध्ये का लोकप्रिय आहे, हे सांगताना भगवान राम आणि भगवान शिव यांचे उदाहरण दिले. त्यांनी भगवान शिव हे गरीबांचे देव आहेत, तर राम हे श्रीमंतांचे देव आहेत, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला आहे. भाजपने म्हटले आहे की, रेवंत रेड्डी आता देवांमध्येही विभाजनाची रेषा आखत आहेत.
सोमवारी रेवंत रेड्डी म्हणाले, ‘भाजपने भगवान राम यांना स्वतःच्या ताब्यात घेतले आहे, ज्यांची उत्तर भारतात पूजा केली जाते, तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये शिवाची पूजा केली जाते.’ ते म्हणाले, ‘आम्ही द्रविड आहोत. इथे (उत्तर भारतात) लोक आर्य आहेत. आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत आणि हे भगवान रामाचे भक्त आहेत. भाजपने रामाला स्वतःच्या ताब्यात घेतले आहे. हा भावना आणि श्रद्धेशी संबंधित विषय आहे.’
केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी म्हटले की, यापूर्वी ‘काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस’ असे म्हणणारे रेवंत रेड्डी आता भगवान राम आणि भगवान शिव यांच्यात राजकीय विभाजनाची रेषा आखत आहेत.
‘भाजप हर हर महादेव का म्हणत नाही?’
वास्तविक, काँग्रेस दक्षिणेप्रमाणे उत्तर आणि पूर्व भारतात फारशी लोकप्रिय का नाही, असा प्रश्न रेवंत रेड्डी यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, ‘मोदीजी ‘हर हर महादेव’ का म्हणत नाहीत? भाजपच्या लोकांनी कधी व्यासपीठावरून ‘हर हर महादेव’ म्हटले आहे का? ते केवळ ‘जय श्री राम’ म्हणतात. जेव्हा आम्ही ‘हर हर महादेव’ म्हणतो, तेव्हा त्यांना ते आवडत नाही.’
रेवंत रेड्डी यांनी दावा केला की, ‘शिव हे गरीबांचे देव आहेत, राम हे श्रीमंतांचे देव आहेत आणि भाजप हा श्रीमंतांचा पक्ष आहे.’
SIR विरोधात आंदोलनाची तयारी
रेवंत रेड्डी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्याविरोधात ‘सायमन गो बॅक’सारखे आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, सायमन गो बॅक आंदोलनाप्रमाणे ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि एम. के. स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन ‘SIR गो बॅक’ आंदोलन चालवावे.
काँग्रेस घेऊ शकते मोठा निर्णय
मंगळवारी काँग्रेस कार्यसमिती अर्थात CWC ची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा SIR आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत वाद सुरू आहे.
या बैठकीदरम्यान काँग्रेस आंदोलनाची सुरुवात करण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयात जाण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते, असे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
काँग्रेसने सोमवारी देशभरात निदर्शने केली. यावेळी जयपूरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. डाव्या पक्षांनी पाटण्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीनगर आणि लखनऊसह इतर ठिकाणीही निदर्शने केली. लखनऊमध्ये उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी म्हटले की, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आमचा विरोध देशव्यापी आहे.
मोठा वाद
अलीकडेच ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तात दावा करण्यात आला होता की, निवडणूक आयोगातील निर्णयांबाबत अनेक प्रसंगी दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर असहमती व्यक्त केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच SIR वरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने उत्तर देताना सांगितले की, सर्व निर्णय अधिकाऱ्यांच्या सहमतीने घेण्यात आले होते.