

pitru paksha 2026 5 auspicious shubh animals birds ancestors signs shradh
पुढारी ऑनलाईन : Pitru Paksha 2026 : गरुड पुराणानुसार, पितृ पक्षादरम्यान आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या जीवाच्या रूपात आपल्या दारात येतात, अशी मान्यता आहे. या 16 दिवसांत तुमच्या घरी कावळा, काळा कुत्रा, गाय, मुंग्या किंवा चिमणी आली, तर हा पितरांच्या प्रसन्नतेचा मोठा संकेत मानला जातो.
पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. हा काळ पूर्वजांप्रती आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र काळ मानला जातो. अशी धार्मिक मान्यता आहे की, या 16 दिवसांमध्ये आपले पितर देव लोकातून पृथ्वीवर आपल्या कुटुंबीयांमध्ये येतात आणि विविध माध्यमांतून आशीर्वाद किंवा संकेत देतात.
गरुड पुराण आणि धार्मिक ग्रंथांनुसार, पितृ पक्षादरम्यान आपले पूर्वज स्वतः कोणत्या ना कोणत्या जीवाच्या रूपात तुमच्या दारात येऊ शकतात. या काळात तुमच्या घरात काही विशिष्ट जीव आले किंवा त्यांनी अन्न मागितले, तर त्यांना चुकूनही हाकलू नये किंवा त्रास देऊ नये. ज्योतिषशास्त्रात हे पितर प्रसन्न असल्याचे आणि घरात सुख-समृद्धी येण्याचे प्रत्यक्ष संकेत मानले जातात. चला जाणून घेऊया, पितृ पक्षात कोणते 5 जीव घरी येणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ते कशाचे संकेत देतात.
कावळा (Crow)
पितृ पक्षात कावळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये कावळ्याला पितरांचे रूप किंवा संदेशवाहक मानले जाते. जर पितृ पक्षात कावळा तुमच्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीत येऊन काव-काव करत असेल किंवा तुम्ही ठेवलेले अन्न शांतपणे खात असेल, तर तुमचे पूर्वज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत, असे मानले जाते. यामुळे घरातील पितृदोष दूर होतात आणि अडकलेला पैसा मिळतो, अशी मान्यता आहे.
काळ्या मुंग्या (Black Ants)
घराच्या अंगणात किंवा स्वयंपाकघराच्या आसपास काळ्या मुंग्या समूहाने दिसणे शुभ शकुन मानले जाते. पितृ पक्षादरम्यान काळ्या मुंग्या एका रांगेत जाताना दिसल्या, तर पूर्वज तुमच्या घरातून दारिद्र्य दूर करत असल्याचा हा संकेत मानला जातो. त्यांना साखर किंवा पीठ टाकावे. यामुळे व्यवसायात लाभ होतो आणि कर्जातून सुटका मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
काळा कुत्रा (Black Dog)
कुत्र्याला भगवान भैरवाचे वाहन मानले जाते आणि त्याला यमराजाचा द्वारपाल असेही म्हटले जाते. जर पितृ पक्षात एखादा काळा कुत्रा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आला किंवा शेपटी हलवत अन्नाची अपेक्षा करत असेल, तर त्याला पोळी किंवा बिस्किट जरूर खाऊ घालावे. असे केल्याने अनिष्ट टळते, राहू-केतूचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि पितर प्रसन्न होऊन सुरक्षेचे कवच प्रदान करतात, अशी मान्यता आहे.
गाय (Cow)
हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असल्याचे मानले जाते. श्राद्धामध्ये ‘गोग्रास’ काढण्याची परंपरा महत्त्वाची मानली जाते. जर पितृ पक्षादरम्यान गाय स्वतः चालत तुमच्या घराच्या दारात आली आणि हंबरली, तर हा अत्यंत शुभ शकुन मानला जातो. पहिली पोळी किंवा श्राद्धाचे अन्न गायीला खाऊ घातल्याने घरात आरोग्य, वंशवृद्धी आणि अखंड सौभाग्य नांदते, अशी मान्यता आहे.
चिमणी किंवा इतर पक्षी (Sparrow or Bird)
घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा तुळशीच्या रोपाजवळ येऊन चिमणीचे चिवचिवणे किंवा दाणे टिपणे अत्यंत शुभ मानले जाते. श्राद्ध पक्षात चिमणी तुमच्या घरात घरटे बांधत असेल किंवा तुम्ही ठेवलेले धान्याचे दाणे टिपत असेल, तर हा पूर्वजांच्या तृप्तीचा संकेत मानला जातो. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो आणि लवकरच एखादी शुभ व मंगल बातमी ऐकायला मिळते, अशी मान्यता आहे.
पितृ पक्षात लक्षात ठेवण्यासारख्या विशेष गोष्टी
घरात आलेल्या कोणत्याही पशू-पक्ष्याला काठीने मारू नका आणि दटावून हाकलून देऊ नका.
छतावर किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी स्वच्छ पाण्याचे परिंडे आणि धान्य (तांदूळ व बाजरी) जरूर ठेवा.
श्राद्धाच्या दिवशी भोजन तयार केल्यानंतर सर्वप्रथम देव, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी भोजनाचा काही भाग (पंचबली) वेगळा काढावा.
वरील माहिती धार्मिक मान्यता आणि श्रद्धा आणि सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. या विषयी अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेउनच कोणतीही कृती करणे उचित ठरेल..