

CM Vijay gold ring scheme : नवजात बालकांसाठी १ ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्याचा निर्णय तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या थलपती विजय यांच्या सरकारने घेतला आहे. १५ सप्टेंबरपासून आहे. विशेष म्हणजे, ही योजना २२ जूनपासूनच लागू मानली जाईल. ही योजना मुख्यमंत्र्यांनी २३ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणेची पूर्तता करणार आहे. राज्यात आपले सरकार आल्यास जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला 'मामा' म्हणून सोन्याची अंगठी भेट देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री विजय यांनी दिले होते मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय १५ सप्टेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ करतील.
राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला सोन्याची अंगठी मिळणार असून, आजच्या दरानुसार तिची किंमत सुमारे १३,६०० रुपये आहे. कुटुंबात नवीन बाळ आल्याच्या आनंदात दिल्या जाणाऱ्या 'थैमामन सीर' (मामाची भेट) या सांस्कृतिक परंपरेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. या परंपरेनुसार नवजात बालकाचे स्वागत केले जाते आणि कुटुंबाला आशीर्वाद दिला जातो. सरकारी आदेशात म्हटले आहे की, "या योजनेच्या माध्यमातून सरकार आपल्या संस्थांमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक बाळासाठी 'मामा'ची भूमिका बजावत आहे आणि स्वागताचे प्रतीक म्हणून सोन्याची अंगठी देत आहे."
'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे'च्या (NFHS-6) आकडेवारीनुसार, तामिळनाडू राज्यात दरवर्षी सुमारे ७.८ लाख प्रसूती होतात, ज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण ९९.९ टक्के आहे. यापैकी सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे ४.२ लाख (५३ टक्के) प्रसूती होतात. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रत्येक प्रसूतीसाठी पालकांना सरासरी केवळ १,३६४ रुपये खर्च येतो, तर खासगी रुग्णालयांमध्ये हा खर्च तब्बल ६३,४७३ रुपये इतका आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार एक 'स्टेट प्रोजेक्ट/प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट' स्थापन करणार आहे, जी एक समर्पित प्रशासकीय संस्था असेल. ही संस्था 'थैमामन थंगा मोथिरम थिट्टम' योजनेची अंमलबजावणी, देखरेख आणि व्यवस्थापन करेल. या योजनेच्या माध्यमातून नवजात बालकांना १ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाईल.
२३ जून रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशात म्हटले आहे की, "शासकीय संस्थांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांना दिली जाणारी १ ग्रॅम सोन्याची अंगठी हे कौतुक आणि आठवणीचे प्रतीक आहे. हे बालकाच्या जन्माच्या स्मरणार्थ आणि 'थाईमामन थंगा मोथिरम थिट्टम'च्या माध्यमातून मातृत्वाचा आनंद आणि त्याचे महत्त्व साजरे करते."
सरकारने स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री विजय अधिकृतपणे १५ सप्टेंबर रोजी या योजनेची सुरुवात करतील. हा दिवस माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांची जयंती आहे. मात्र, ही योजना २२ जूनपासूनच लागू होणार आहे, कारण २२ जून रोजी विजय यांचा वाढदिवस असतो. या नाविन्यपूर्ण योजनेसाठी दरवर्षी सुमारे ७५५.८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.