

डॉ. सुकृत खांडेकर
उच्चशिक्षित व व्यावसायिक टीम बरोबर घेऊन थलपती विजय यांनी नवीन तामिळनाडू घडविण्यासाठी आपली इनिंग सुरू केली आहे. अनुभवातूनच त्यांना राजकारण व सत्ताकारण शिकायचे आहे. कामाची आखणी व नियोजन यासाठी त्यांच्याकडे स्वत:चा थिंक टँक आहे. राज्यातील बेरोजगारी, आरोग्य सेवा, उद्योग, व्यवसाय, कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक संतुलन या विषयांवर नव्या सरकारला गांभीर्याने सामोरे जावे लागणार आहे.
तामिळनाडूत 23 एप्रिल रोजी विधानसभेच्या 234 जागांसाठी मतदान झाले. चार मे रोजी मतमोजणीनंतर सुपरस्टार अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे सर्वाधिक 108 आमदार विजयी झाल्याचे घोषित झाले आणि 13 मे रोजी विधानसभेत विजय यांना विश्वासदर्शक ठरावावर 144 आमदारांचे समर्थन प्राप्त झाले. थलपती सी जोसेफ विजय यांच्या यशाने गेली सहा दशके तामिळनाडूवर वर्चस्व गाजविणार्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही राजकीय पक्षांची सद्दी संपुष्टात आली. इ. के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुकमधे फूट पडली आणि बंडखोर आमदारांनी पक्षाचा व्हिप झुगारून मुख्यमंत्री विजय यांना समर्थन दिले. काँग्रेस पक्षानेही द्रमुकची साथ सोडून विजय यांना पाठिंबा दिला. निवडणुकीत विजय यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी 118 हा जादुई आकडा गाठता आला नाही; पण काँग्रेस, अण्णा द्रमुकमधील बंडखोर व अन्य लहान पक्षांच्या मदतीने त्यांच्या सरकारला बहुमत प्राप्त झाले आहे. एक अभिनेता म्हणून विजय यांना तामिळनाडूत अफाट लोकप्रियता आहे. एमजी रामचंद्रन यांच्यानंतर मोठे जनसमर्थन त्यांनी मिळवले. लोकप्रिय अभिनेते के. चिरंजीवी, विजयकांत किंवा कमाल हसन यांना जमले नाही ते विजय यांनी साध्य करून दाखवले आहे. ते राजकारणात नवीन आहेत; पण आपली बांधिलकी जनतेशी आहे, हे त्यांनी आपल्या वर्तवणुकीतून दाखवून दिले आहे. केंद्रात भाजपप्रणीत एनडीएचे सरकार आहे आणि तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्यासारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी विरोधक त्यांच्या समोर आहे. सरकार स्थापनेसाठी ज्यांनी- ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्या अपेक्षांना काही दिवसांत धुमारे फुटण्याची शक्यता आहे. थलपती विजय यांना अनुभवातूनच राजकारण व सत्ताकारण शिकायचे आहे.
मुख्यमंत्री विजय यांच्याकडे अभिनेता म्हणून कोट्यवधी जनतेचे समर्थन आहे. कामाची आखणी व नियोजन यासाठी त्यांच्याकडे स्वत:चा थिंक टँक आहे. तामिळनाडूत वर्षानुवर्षे घराणेशाही, जातिवाद आणि भावनिक आवाहन या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जात होत्या. यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी हे सारे मुद्दे झुगारून लावले. विजय यांच्या सरकारमध्ये योग्यता, गुणवत्ता , शिक्षण पाहूनच दहा जणांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. टीव्हीकेच्या 108 आमदारांमध्ये 6 पीएच.डी., 22 पोस्ट ग्रॅज्युएट, 5 आयआयटी इंजिनिअर्स, 8 एमबीबीएस डॉक्टर, 40 वकील व इंजिनिअर्स आहेत. विजय व त्यांच्या टीमने उमेदवारी देताना गुणवत्तेवर भर दिला आहे. राज्यातील बेरोजगारी, आरोग्य सेवा, उद्योग, व्यवसाय, कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक संतुलन या विषयांवर नव्या सरकारला गांभीर्याने सामोरे जावे लागणार आहे. सत्ता ही केवळ घराणेशाहीची मक्तेदारी नाही, हाच संदेश तामिळनाडूच्या निवडणूक निकालाने दिला आहे. उच्चशिक्षित व व्यावसायिक टीम बरोबर घेऊन थलपती विजय यांनी नवीन तामिळनाडू घडविण्यासाठी आपली इनिंग सुरू केली आहे.
थलपती विजय हे तामिळनाडूचे 9 वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विजयात जी झेनची भूमिका महत्त्वाची आहे. ते 51 वर्षांचे आहेत. सी. एन. अण्णा दुराई हे वयाच्या 57 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. के. कामराज 51, एम. करुणानिधी 44, सी. रामचंद्रन 60, जे. जयललिता 43, ओ. पनीरसेल्वम 50, ए. के. पलाइस्वामी 62 आणि एम. के. स्टॅलिन हे वयाच्या 68 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. करूणानिधी यांनी पाच वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली व ते सर्वाधिक 18 वर्षे या पदावर राहिले. जयललिता यांनी 6 वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. घरोघरी ‘अम्मा’ म्हणून त्यांनी स्थान मिळवले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी राज्यात 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या निर्णयावर पहिली स्वाक्षरी केली. महिलांच्या सुरक्षिततेसासाठी टास्क फोर्स स्थापन केला. शाळा, धार्मिक स्थळे व बस स्थानकांपासून 500 मीटर अंतराच्या आत असलेली 717 दारूची दुकाने तत्काळ बंद करावीत असा आदेश दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसर्याच दिवशी त्यांनी स्टॅलिन तसेच अन्य विरोधी पक्षनेत्यांच्या घरी जाऊन त्यांना शाल घालून त्यांच्याशी संवाद साधला. राज्यपालांनी शपथ दिल्यानंतर त्याच मंचावर मंत्रिमंडळाचा ग्रुप फोटो काढायचा असल्याने जेव्हा मंचावरील टेबलांची हलवाहलवी सुरू झाली तेव्हा स्वत: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या विजय यांनी लोकभवनच्या कर्मचार्यांना टेबले हलवताना मदत केली. हे द़ृश्य पाहून तेथे उपस्थित असलेले राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन्य अनेक मान्यवर आश्चर्यचकीत झाले.
विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि अण्णा द्रमुक पक्षात बंडाचा झेंडा फडकवला गेला. या पक्षाचे प्रमुख पलानीस्वामी यांच्या वाढदिवसालाच पक्ष दुभंगला. बंडखोरांनी विजय यांना पाठिंबा जाहीर केला. जयललिता यांच्या निधनापासून अण्णा द्रमुक पक्षात नेतृत्वाचा वाद चालूच होता. पक्षाला सर्वमान्य नेता मिळाला नाही. पक्षाला गळती लागली. 2019 लोकसभा, 2021 विधानसभा, 2024 लोकसभा, 2025 इरोड विधानसभा पोटनिवडणूक आणि आता 2026 विधानसभा अशा सलग पाच निवडणुकांमधे अण्णा द्रमुकला अपयश आले. म्हणून पक्षात खदखद वाढली. एसपी वेलुमणी व सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली 28 आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिला. द्रमुकला विरोध करण्यासाठी अण्णा द्रमुक पक्षाची स्थापना झाली. गेली सहा दशके या दोन पक्षांनाच आलटून-पालटून तामिळनाडूची सत्ता मिळत होती. काँग्रेस, भाजपसह कोणत्याही पक्षाची या दोन पक्षांपुढे डाळ शिजली नाही; मात्र यंदा विजय यांच्या टीव्हीके पक्षाने दोन्ही द्रविड पक्षांना पराभूत करून इतिहास घडवला.
विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने 2006 मध्ये निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून आला व 8.4 टक्के मते मिळाली. चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पार्टीने 2009 मध्ये निवडणूक लढवली तेव्हा 18 आमदार निवडून आले व 16. 3 टक्के मते मिळाली. 2026 मध्ये विजय यांच्या टीव्हीकेचे 108 आमदार विजयी झाले व 35 टक्के मते मिळाली. कमाल हसन यांचा एमएमएम, सीमन यांचा एनटीके, अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम, एएमएमके असे अनेक स्थानिक पक्ष आले नि गेले; पण दोन्ही द्रविड पक्षांना त्याचा काही फरक पडला नाही. तामिळनाडूत पाया रोवण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले. अण्णा मलाई यांना शक्ती दिली; पण 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत एनडीएचा एकच खासदार निवडून आल्याने अण्णा मलाईंचे महत्त्व कमी झाले. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अण्णा द्रमुकशी युती करून 33 जागा लढवल्या; पण एकच आमदार निवडून आला.
विजय मुख्यमंत्री झाल्याने स्टॅलिन यांची सत्ता गेली. स्वत: स्टॅलिन यांचाच पराभव झाला. काँग्रेसने विजय यांना पाठिंबा दिल्याने द्रमुकने काँग्रेसशी फारकत घेतली. 1967 नंतर प्रथमच बिगर द्रमुक आणि बिगर अण्णा द्रमुक असे तिसर्या पक्षाचे सरकार तामिळनाडूत स्थापन झाले. स्टॅलिन यांच्या द्रमुक सरकारच्या काळात राज्यावर दहा लाख कोटींचे कर्ज झाल्याचे सांगून राज्याच्या अर्थव्यवस्थेवर लवकरच श्वेतपत्रिका काढणार असल्याचे विजय यांनी जाहीर केले आहे. स्टॅलिन यांच्या काळात कल्याणकारी योजनांवर अर्थसहाय्य म्हणून 73 हजार कोटी खर्च होत होते. विजय यांनी 200 युनिट वीज मोफत दिल्यावर वर्षाला 17 हजार 500 कोटींचा ताण सरकारी तिजोरीवर पडणार आहे. शिवाय लाडक्या बहिणींना दरमहा 2500 रुपये, वर्षाला सहा घरगुती गॅस सिलिंडर, 10 लाख बेरोजगारांना दरमहा 4 हजार, मुलींना लग्नाच्या वेळी सोन्याची रिंग आदी आश्वासने पूर्ण करायची, तर तामिळनाडूची आर्थिक अवस्था काय होईल, हे विजय यांनीच ठरवायचे आहे.