

Shiv Sena Symbol Dispute
नवी दिल्ली : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलै रोजी घेणार आहे.
ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या आठवड्यात अथवा पुढील आठवड्यात तत्काळ सूचिबद्ध करण्याची मागणी केली.
दरम्यान, खंडपीठाने आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवसांत ही याचिका सूचीबद्ध करण्यास सहमती दर्शवली नाही. तर एकनाथ शिदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी असे सादर केले की, ७ मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने तत्काळ सुनावणीची विनंती फेटाळून लावली होती. त्यावर, ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कामत म्हणाले की न्यायमूर्ती कांत यांच्या खंडपीठाने न्यायालयीन सुट्टीत हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली होती.
त्यानंतर खंडपीठाने १४ जुलै रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निश्चित केले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर आता १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.