

३ जानेवारी २०२६ रोजी वर्षातील पहिले पौर्णिमेचे चंद्रदर्शन घडणार आहे, या दिवशी वर्षातील पहिला सुपरमून असेल. तो इतर पौर्णिमेपेक्षा खूप मोठा असेल. याला वुल्फ मून असेही म्हणतात.
Super Moon January 2026
नवी दिल्ली : नववर्ष २०२६ ची एका विलोभनीय खगोलीय घटनेने होणार आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी वर्षातील पहिले पौर्णिमेचे चंद्रदर्शन घडणार आहे. या दिवशी वर्षातील पहिला सुपरमून असेल. तो इतर पौर्णिमेपेक्षा खूप मोठा असेल. याला वुल्फ मून असेही म्हणतात. विशेष म्हणजे, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार असल्याने तो 'सुपरमून'च्या रूपात अवकाशात तळपताना दिसेल. स्वच्छ आकाश असल्यास संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसेल.
हा केवळ २०२६ चा पहिलाच पूर्ण चंद्र नसेल, तर वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असणार आहे. या दिवशी चंद्र त्याच्या कक्षेतील पृथ्वीपासूनच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल. त्यामुळे तो सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा साधारण १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसेल.
जेव्हा पौर्णिमा आणि चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असतो, तेव्हा सुपरमून होतो. ३ जानेवारी २०२६ रोजी चंद्र पृथ्वीपासून केवळ ३,५६,८०० किलोमीटर अंतरावर असेल. हे सरासरी अंतरापेक्षा सुमारे १० टक्क्यांनी कमी आहे. २०२६ मध्ये दिसणाऱ्या ३ ते ४ सुपरमूनपैकी हा पहिला सुपरमून असेल.
भारतीय प्रमाणवेळेनुसार ३ जानेवारी रोजी दुपारी ३:३३ वाजता चंद्र पूर्णत्वास पोहोचेल. मात्र, भारतात याचे खरे विलोभनीय रूप सूर्यास्तानंतर, म्हणजेच चंद्रोदयाच्या वेळी पाहायला मिळेल. २ आणि ३ जानेवारीच्या संध्याकाळी चंद्र पूर्व क्षितिजावर नेहमीपेक्षा थोडा खाली दिसेल. यामुळे उगवणारा चंद्र आकाराने मोठा, अधिक सोनेरी आणि पृथ्वीच्या अगदी जवळ असल्यासारखा वाटतो. भारतात संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास हा सुपरमून दिसू लागेल आणि रात्रभर आकाशात प्रकाशमान असेल.
या पौर्णिमेला 'वूल्फ मून' म्हणण्यामागे प्राचीन अमेरिकन आणि युरोपीय परंपरांचा संदर्भ आहे. जानेवारी महिना हा कडाक्याची थंडी आणि अन्नाच्या टंचाईचा काळ असतो. या काळात अन्नाच्या शोधात असलेले लांडगे गावांच्या बाहेर येऊन मोठ्याने ओरडत असत. त्यांच्या या ओरडण्यावरूनच जानेवारीतील पौर्णिमेला 'वूल्फ मून' असे नाव पडले.
स्वच्छ आकाश असल्यास, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळूरु यांसारख्या शहरांसह संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसेल. उत्तर भारतात, थंड हिवाळ्याची हवा आणि स्वच्छ आकाशामुळे दृश्य अधिक स्पष्ट दिसण्याची शक्यता आहे, तर दक्षिण भारतात, संध्याकाळी पूर्वेकडील आकाशात चंद्र उगवताना तो लक्षणीयरीत्या मोठा दिसेल.