

वॉशिंग्टन : विश्वाच्या अथांग पसार्यातून शास्त्रज्ञांनी एक असा शोध लावला आहे, जो सध्याच्या भौतिकशास्त्राच्या नियमांनाच आव्हान देत आहे. NSF च्या ग्रीन बँक ऑब्झर्व्हेटरीच्या (GBO) नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या एका टीमने ‘लाँग पिरियड रेडिओ ट्रान्झिएंट’ (LPT) प्रकारची एक अत्यंत दुर्मीळ खगोलीय वस्तू शोधून काढली आहे, जिला "CHIME J1634+44’ असे नाव देण्यात आले आहे. ही वस्तू इतकी अद्वितीय आहे की, शास्त्रज्ञ तिला ‘युनिकॉर्न’ असे संबोधत आहेत. हा शोध केवळ एका नवीन खगोलीय वस्तूचा नाही, तर तो विश्वाच्या मूलभूत नियमांबद्दल नवीन प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे.
‘लाँग पिरियड रेडिओ ट्रान्झिएंट’ (LPT) या अशा खगोलीय वस्तू आहेत, ज्या ठरावीक अंतराने रेडिओ लहरींचे उत्सर्जन करतात. या वस्तू ‘रोटेटिंग रेडिओ ट्रान्झिएंटस्’ (RRTs) सारख्याच असतात, ज्यांचे उत्सर्जन स्पंदन करणार्या न्यूट्रॉन तार्यांमुळे (पल्सर) होत असल्याचे मानले जाते. मात्र, LPTs आणि RRTs मध्ये एक मोठा फरक आहे : LPTs चा परिवलन काळ (Rotation Period) खूप जास्त असतो, जो काही मिनिटांपासून ते तासांपर्यंत असू शकतो.’CHIME J1634+44’ ही वस्तू इतर सर्व LPTs पेक्षा वेगळी आहे.
आतापर्यंत सापडलेली ही एकमेव LPT आहे, जिचा फिरण्याचा वेग कमी होण्याऐवजी वाढत आहे. यासोबतच, तिचे ध्रुवीकरण सुद्धा असामान्य आहे, जे शास्त्रज्ञांसाठी एक मोठे कोडे ठरले आहे. या वस्तूच्या वर्तनामुळे शास्त्रज्ञही चक्रावून गेले आहेत. NSF GBOचे जान्स्की फेलो, फेंगकिउ अॅडम डोंग यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘तुम्ही CHIME J1634+44 ला इतर LPTs मध्येही ‘युनिकॉर्न’ म्हणू शकता.
यातून येणारे रेडिओ सिग्नल एकतर दर 14 मिनिटांनी (841 सेकंद) किंवा दर 70 मिनिटांनी (4206 सेकंद) पुन्हा येतात. हा दुसरा कालावधी पहिल्यापेक्षा बरोबर पाचपट जास्त आहे. आम्हाला वाटते की, हे दोन्ही कालावधी खरे आहेत आणि ही बहुधा एका न्यूट्रॉन तार्याभोवती फिरणार्या दुसर्या वस्तूची प्रणाली असावी.’ याचाच अर्थ, ही एकटी वस्तू नसून, एका न्यूट्रॉन तार्याभोवती फिरणारी एखादी अज्ञात वस्तू असू शकते, ज्यामुळे हे विचित्र सिग्नल निर्माण होत आहेत. हा अभूतपूर्व शोध अनेक शक्तिशाली दुर्बिणींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाला.