

लंडन : ‘एंटीकाइथेरा’ या ग्रीक बेटाजवळ समुद्रतळाशी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एका प्राचीन जहाजाचे अवशेष सापडले होते. यामध्ये एक अनोखे यंत्रही सापडले, जे थक्क करणारेच होते. हे यंत्र सध्याच्या अॅनालॉग कॉम्प्युटरसारखेच काम करणारे होते. त्याचा वापर सूर्य-चंद्र तसेच अन्य ग्रहांच्या हालचालींविषयी जाणून घेण्यासाठी केला जात होता. दोन हजार वर्षांपूर्वीचे हे यंत्र सध्या अथेन्सच्या नॅशनल आर्कियोलॉजिकल म्युझियममध्ये ठेवलेले आहे.
कांस्य धातूपासून बनवलेले हे यंत्र ज्यावेळी सापडले, त्यावेळी ते समुद्रतळाशी असलेल्या चिखलाने माखलेले होते. ते स्वच्छ करून त्याची तपासणी केली, त्यावेळी हे उपकरण हेलेनिस्टिक काळातील वैज्ञानिकांची एक अजोड निर्मिती असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्याला ‘एंटीकाइथेरा मेकॅनिझम’ असे म्हटले गेले. हे एक प्राचीन व हाताने संचलित होणारी ग्रीक ऑरेरी (सौरमंडळाचे मॉडेल) आहे, ज्याला अॅनालॉग कॉम्प्युटरचे प्राचीन रूप मानले जाते. सूर्य आणि चंद्राच्या ग्रहणांची भविष्यवाणी करण्यासाठीही त्याचा वापर केला जात असे. तसेच पुढील ऑलिम्पिक खेळांबाबतचे संकेत देण्यासाठीही प्राचीन ग्रीकमध्ये हे यंत्र वापरले जाई. काही तज्ज्ञ हे यंत्र इसवी सनपूर्व 87 च्या आसपासचे असावे असे मानतात, तर काहींच्या मते त्यापेक्षाही जुने म्हणजे इसवी सनपूर्व 205 च्या दरम्यानचे असावे, असे म्हणतात. सन 1902 मध्ये पुरातत्त्व संशोधक वेलेरियोस स्टेस यांनी त्याची ओळख एक गिअर म्हणून केली होती. 2005 मध्ये कार्डिफ युनिव्हर्सिटीतील एका टीमने कॉम्प्युटर एक्स-रे टोमोग्राफी आणि हाय रिझोल्यूशन स्कॅनिंगचा वापर केला. त्यांनी या यंत्राच्या आतील तुकड्यांची एक प्रतिमा बनवली आणि त्यावर कोरलेल्या मजकुराला वाचण्याचा प्रयत्न केला. त्यावरून समजले की, यामध्ये 37 जाळीदार कांस्य गिअर होते. लक्षपूर्वक पाहिल्यावर त्यामध्ये काही स्केलही असल्याचे दिसते.